जेईई अॅडव्हान्स परीक्षेचे वेळापत्रक जाहीर (फोटो- istockphoto)
जेईई अॅडव्हान्स २०२६’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर
भारतीय तंत्रज्ञान संस्था रुरकीने दिली माहिती
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया ६ एप्रिलपासून सुरू होणार
पुणे: देशातील सर्वोच्च अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या संयुक्त प्रवेश परीक्षा ‘जेईई अॅडव्हान्स २०२६’चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था रुरकीकडून ही माहिती देण्यात आली. या परीक्षेसाठीची ऑनलाइन (Career News) अर्ज प्रक्रिया ६ एप्रिलपासून सुरू होणार असून, परीक्षा १७ मे २०२६ रोजी देशभरातील विविध केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
अभियांत्रिकी क्षेत्रात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘जेईई अॅडव्हान्स’ ही अत्यंत महत्त्वाची प्रवेश परीक्षा मानली जाते. ‘जेईई मेन्स’नंतरची ही पुढील आणि निर्णायक पायरी असून, या परीक्षेत यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातील अग्रगण्य भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये (आयआयटी) प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध होते.
परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र ११ ते १७ मे २०२६ या कालावधीत अधिकृत संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे. परीक्षा एकाच दिवशी दोन स्वतंत्र सत्रांमध्ये होणार आहे. पहिला पेपर सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत होईल, तर दुसरा पेपर दुपारी २.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत घेण्यात येणार आहे. दोन्ही पेपर देणे सर्व उमेदवारांसाठी बंधनकारक असल्याने विद्यार्थ्यांनी पूर्ण दिवसासाठी तयारी करूनच परीक्षेला उपस्थित राहावे लागणार आहे.
पात्रतेच्या निकषांनुसार ‘जेईई मेन्स २०२६’च्या पेपर-१ मध्ये पहिल्या दोन लाख ५० हजारांमध्ये स्थान मिळवणारे विद्यार्थीच ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेसाठी पात्र ठरतात. हा नियम सर्व श्रेणींतील विद्यार्थ्यांना लागू आहे. विद्यार्थ्यांना ही परीक्षा जास्तीत जास्त दोन वेळा देता येते आणि त्या संधी सलग दोन वर्षांच्या कालावधीतच वापराव्या लागतात.
परदेशात शिक्षण घ्यायचे आहे?
आजच्या काळात नोकरी मिळवणे जितके कठीण झाले आहे, तितकेच योग्य शिक्षण आणि कौशल्य मिळवणेही महत्त्वाचे झाले आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक तरुणाची अशी इच्छा असते की त्याला चांगल्या पगाराची आणि सुरक्षित भवितव्य देणारी नोकरी मिळावी. त्यामुळे अनेक विद्यार्थी आता परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा पर्याय निवडत आहेत. परदेशातील काही अभ्यासक्रम असे आहेत ज्यामुळे जागतिक स्तरावर करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध होतात.
हेल्थकेअर क्षेत्र हे नेहमीच स्थिर आणि सुरक्षित मानले जाते. महामारी असो किंवा आर्थिक संकट, डॉक्टर, नर्स आणि इतर वैद्यकीय तज्ज्ञांची गरज कधीच कमी होत नाही. त्यामुळे मेडिसिन, नर्सिंग, फार्मसी किंवा हेल्थ मॅनेजमेंट यासारखे कोर्स परदेशात करून चांगले करिअर घडवता येते. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना समाजसेवेची संधी मिळते आणि त्याचबरोबर आर्थिक स्थैर्यही मिळते.






