उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशमधील (UP) बागपत (Baghpat Case) येथील बदरुद्दीन शाह मजार (Badruddin Shah Mazar) (कबर) आणि लाक्षागृह (Lakshagriha) वादात न्यायालयाने हिंदू पक्षकारांच्या बाजूने निर्णय दिला आहे. तब्बल 52 वर्षांनंतर न्यायालयाने मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली आहे. अयोध्येतील राम मंदिरानंतर (Ayodhya Ram Mandir) सध्या कृष्णजन्मभूमी मथुरा (Krishna Janmabhoomi Mathura) व ज्ञानवापी मशीदीच्या (Gyanvapi Masjid) बाबतीत देखील न्यायालयीन प्रक्रियेने वेग घेतला आहे. दरम्यान, बागपत येथील वादावर देखील कोर्टाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
उत्तर प्रदेशमधील बागपत येथील वादग्रस्त जागेवर मागील 50 वर्षांपासून न्यायालयात खटला चालू होता. याबाबत अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी निर्णय दिला असून न्यायमूर्तींनी हिंदू पक्षकारांच्या बाजूने निकाल दिला आहे. तसेच बागपत येथील वादग्रस्त 100 बिघा (जवळपास पाच एकर) जमीन हिंदू पक्षकारांना दिली आहे. 1970 साली हा वाद समोर आला. मुकीन खान या मुस्लीम व्यक्तीने येथील लाक्षागृहास बदरुद्दीन शाह यांची कबर आणि कब्रस्तान (मुस्लीम समुदायाची स्मशानभूमी) म्हटलं होतं. मुस्लीम पक्षकारांनी या जागेवर दावा केला.
या दाव्यानंतर हिंदू संघटनांनी याप्रकरणी याचिका दाखल केली. तब्बल 50 वर्षे चालू असलेल्या या खटल्यावेळी हिंदू पक्षकारांनी अनेक पुरावे सादर केले. महाभारत काळापासून या ठिकाणी लक्षागृह (लाखापंडप) अस्तित्वात आहे. या जागेचा पांडवांशी संबंध आहे. असे हिंदू पक्षकारांचे म्हणणे होते. या जागेवर भारतीय पुरातत्व विभागाने 1952 साली उत्खनन केले. यावेळी तिथे 4,500 वर्षे जूनी भांडीदेखील सापडली होती. ही भांडी महाभारतकालीन असल्याचा दावा केला जातो.
पांडवकालीन बोगदा जेथून पांडव पळून गेले
महाभारतातील कथेप्रमाणे दुर्योधनाने पांडवांविरुद्ध षडयंत्र रचून त्यांच्या निवाऱ्यासाठी वारणावत (बरनावा) येथे लाखेपासून एक महाल उभारला होता. यामध्ये त्यांना जाळून मारण्याचे नियोजन केले होते मात्र पांडव बोगद्यातून पळून गेले. संस्कृत शाळेतील प्राचार्य आचार्य अरविंद कुमार शास्त्री यांनी सांगितले की, बागपत ही छोटी टेकडी महाभारत काळातील लाक्षागृह आहे. येथे पांडवकालीन बोगदादेखील आहे. याच बोगद्याचा वापर करून पांडव लाक्षागृहातून पळून गेले होते.” तर मुस्लीम पक्षकारांकडून सांगण्यात येत आहे की, संबंधित जागेवर शेख बदरुद्दीन यांचा दर्गा आणि कब्रस्तान आहे. सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्डाकडे दर्गा आणि कब्रस्तानाची नोंद आहे.