Maharashtra Breaking News
10 Oct 2025 02:45 PM (IST)
सोनी सब टीव्हीवरील प्रसिद्ध कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’मध्ये ‘सोढी’ची भूमिका करणारा अभिनेता गुरुचरण सिंह गेले ४ वर्ष अभिनयापासून दूर आहे. सुमारे २ वर्षांपूर्वी तो अचानक गायब झाले होता. कोरोना महामारीनंतर, सुमारे ३ वर्षांपूर्वी, गुरुचरण अचानक बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली होती. तो दिल्लीहून मुंबईला निघाला होतो, पण मधेच गायब झाला. सुमारे तीन आठवड्यांनंतर, तो स्वतः घरी परतला. ही बातमी येताच चाहत्यांमध्ये मोठी चर्चा झाली. पण त्यावेळी त्यांने सांगितलं की त्याला आर्थिक अडचणी होत्या. त्याने हेही मान्य केलं की, अभिनय सोडल्यानंतर त्याच्या खाजगी आयुष्यात अनेक अडथळे आले. त्यामुळेच ते काही काळ सगळ्यांपासून दूर राहिला.
10 Oct 2025 02:40 PM (IST)
Bihar Elections 2025 : बिहार : निवडणूक आयोगाने बिहार विधानसभा निवडणूक जाहीर केल्यानंतर जोरदार राजकारण रंगले आहे. बिहारमध्ये राजकीय हालचालींना वेग आला असला तरी भाजपची रणनीती अद्याप ठरलेली नाही. निवडणुकीच्या दृष्टीने एनडीएकडून कोणताही पत्ता उलघडण्यात न आल्यामुळे चर्चांना उधाण आले. जनशक्ति पार्टी रामविलासचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय मानण्यात येणारे चिराग पासवान यांनी भाजपचा ताण वाढवला आहे. चिराग पासवान हे त्यांच्या मागण्यापासून मागे हटत नसून यामुळे एनडीएचा जागावाटपचा गुंता वाढत चालला आहे.
10 Oct 2025 02:30 PM (IST)
दिवाळीच्या सणाला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहे. “दीपावली” हा संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ “प्रकाशाच्या रांगा” असा होतो. पंचांगानुसार दिवाळीचा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येच्या दिवशी साजरा केला जातो. हा सण अंधारावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. दिवाळीचा सण पाच दिवस साजरा केला जातो. धनत्रयोदशी, नरका चतुर्दशी, लक्ष्मी पूजा, बलिप्रतिपदा म्हणजे पाडवा आणि भाऊबीज हे सण प्रामुख्याने साजरे केले जातात. या प्रत्येक दिवसाला स्वतःचे असे महत्त्व आणि अर्थ आहेत. जाणून घ्या
10 Oct 2025 02:25 PM (IST)
एकता कपूरच्या “सास भी कभी बहू थी” या मालिकेत मुकेश भारती यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या लोकप्रिय टीव्ही मालिकेमुळे त्यांना घराघरात ओळख मिळाली. मुकेश जे. भारती आणि त्यांची पत्नी, चित्रपट निर्माते आणि विवेक फिल्म प्रोडक्शन हाऊसचे मालक मंजू मुकेश भारती हे उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे शूटिंग करत असताना त्यांना जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याचे समजले आहे. या जोडप्याला धमकी देणाऱ्या व्यक्तीने स्वतःला कुख्यात रवी पुजारी टोळीचा सदस्य म्हणून सांगितले. या जोडप्याने पोलिस आयुक्त जे. रवींदर गौर यांच्याकडे तक्रार दाखल केली आणि आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली. पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. या टोळीने यापूर्वी अनेक प्रसिद्ध बॉलीवूड स्टार्सना धमक्या दिल्या आहेत आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत.
10 Oct 2025 02:20 PM (IST)
कर्जत/संतोष पेरणे : मुंबईमधील झोपडपट्टी हलवली जात असून कर्जत तालुक्यात नेरळ शेलू परिसरात मोठ्या प्रमाणावर चाळी बांधल्या जात आहेत. त्या चाळींमध्ये घर घेऊन राहणाऱ्या रहिवाशांना स्थानिक पातळीवर बिल्डरकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत.नेरळ परिसरातील अनेक चाळींमध्ये महावितरण कंपनीचे विजेचे मीटर नाहीत,मात्र त्या चाळींमध्ये वीज पुरवठा सुरळीत सुरू असून महावितरण कंपनीचे दुर्लक्ष की महावितरण कंपनीचं साटंलोटं याबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
10 Oct 2025 02:13 PM (IST)
Trending Viral Video: आपण रोज आपला दिवसभरातील काही वेळ सोशल मिडियावर देखील व्यतीत करत असतो. यावेळेस आपल्याला अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओ किंवा रील्स बघायला मिळतात. ज्यामध्ये अशा गोष्टी असतात की त्या पाहून आपण हसतो, कधी भावुक होतो तर कधी आपल्याला विचार देखील करायला लावतो. सध्या सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका महिलेच्या तोंडातून चक्क साप बाहेर आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
10 Oct 2025 02:01 PM (IST)
MediaTek ने इंडियन मोबाईल काँग्रेस (IMC) 2025 दरम्यान स्मार्ट डिव्हाईसचं भविष्य आणखी मजबूत करण्यासाठी एक नवीन चिपसेट सादर केली आहे. दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये कंपनीने त्यांचे नवीन फ्लॅगशिप मोबाइल प्लेटफॉर्म MediaTek Dimensity 9500 लाँच केले आहे. यासोबतच कंपनीने नेक्स्ट जनरेशनच्या मॅन्युफॅक्चरिंग टेक्नोलॉजीमध्ये एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे. या नव्या चिपसेटमुळे आता स्मार्टफोनचा परफॉर्मंस आणखी सुधारणार आहे.
10 Oct 2025 02:00 PM (IST)
माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा खोडसाळपणा पुणेकरांना माहिती आहे. ते प्रसिद्धी मिळवण्यासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहेत. म्हणूनच ते सुसंस्कृत असलेले राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत, असा आरोप भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला. तसेच शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्यांना समज द्यावी अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीने त्यांच्या भाषेत त्यांना ठोकून काढू’, असं देखील घाटे म्हणाले आहेत.
10 Oct 2025 01:55 PM (IST)
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यांमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल यांनी शतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वाल यांचे हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सातवे शतक आहे. भारताच्या संघासाठी त्याने सातत्याने कमालीची कामगिरी केली आहे, शतक झळकावून तो अजूनही टीम इंडियासाठी फलंदाजी करत आहे. इंग्लंड विरुद्ध झालेल्या मालिकेमध्ये देखील यशस्वी जयस्वाल यांनी चांगली कामगिरी केली होती पण तो त्याची कामगिरी सातत्याने चांगले ठेवू शकला नव्हता. मागील सामन्यामध्ये त्याने चांगल्या दोन्हींनी मध्ये खेळी खेळल्या होत्या.
10 Oct 2025 01:50 PM (IST)
आंतरराष्ट्रीय स्तरावर पश्चिम आशियाच्या शांततेसाठी प्रयत्न केले जात आहेत. मागील अनेक वर्षांपासून हमास आणि इस्त्रालयमध्ये युद्ध सुरु असून यामुळे मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता युद्धबंदीची तयारी पूर्ण करण्यात आली असून काही अटी-शर्तींसह ही युद्धबंदी केली जाणार आहे. इस्रायली मंत्रिमंडळाने युद्धबंदीला सकारात्मक प्रतिसाद देत मंजुरी दिली आहे. दरम्यान, इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धबंदी कराराशी संबंधित एक कथित “संमती दस्तऐवज” समोर आला आहे. यामधील युद्धबंदीच्या अटी सांगण्यात आल्या आहेत.
10 Oct 2025 01:45 PM (IST)
सध्या मराठी चित्रपटांना चांगला दर्जा मिळत आहे. तसेच, ऑक्टोबर महिन्यात अनेक चित्रपट रिलीज होण्याच्या मार्गावर आहे, आणि त्यापैकीच एक म्हणजे मनाचे श्लोक हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाच्या नावावर आक्षेप घेण्यात आला. राष्ट्रसंत श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांनी रचलेल्या ‘मना’चे श्लोक’ या पवित्र धार्मिक ग्रंथाच्या नावाचा वापर करून त्याच नावाने मराठी चित्रपटाची निर्मिती करणे हा हिंदूंच्या श्रद्धेचा बाजार मांडण्यासारखे आहे. चित्रपटाचे नाव तात्काळ बदलले नाही, तर हिंदू समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीकडून करण्यात आली होती.
10 Oct 2025 01:25 PM (IST)
२०२५ च्या नोबेल पुरस्कारांची घोषणा सुरू झाली आहे. या वर्षीच्या रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, शरीरक्रियाविज्ञान किंवा वैद्यकशास्त्र आणि साहित्यातील नोबेल पुरस्कार विजेत्यांची घोषणा आधीच झाली आहे. तथापि, आजच्या घोषणेकडे जगाचे लक्ष लागले आहे. खरं तर, २०२५ चा नोबेल शांतता पुरस्कार आज नॉर्वेमध्ये जाहीर केला जाईल. हा पुरस्कार विशेष असेल कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत सत्तेवर आल्यापासून स्वतःसाठी शांतता पुरस्काराची मागणी केली आहे.
10 Oct 2025 01:15 PM (IST)
रणजी ट्राॅफीचे सामने सुरु आहेत, या स्पर्धेच्या एका सामन्यात मुशीर खान आणि पृथ्वी शॉ यांच्यात कडाक्याचे भांडण झाले होते. नुकताच मुंबईचा माजी संघसहकारी मुशीर खानशी मैदानावर भांडण करून त्याला बॅट दाखवणारा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याला शिक्षा झालेली नाही. तो महाराष्ट्रासाठी रणजी पदार्पण करण्यास सज्ज आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आगामी हंगामासाठी रणजी संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये शॉचा समावेश करण्यात आला आहे. या हंगामापूर्वीच्या तयारीची चाचणी घेण्यासाठी, मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यात तीन दिवसांचा सराव सामना खेळवण्यात आला.
10 Oct 2025 01:10 PM (IST)
महायुती सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही नेहमी चर्चेत राहिली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या या योजनेमुळे विरोधकांनी अनेकदा टीकास्त्र डागले आहे. लाडकी बहीण योजनेंतर्गत प्रत्येक महिलेले दीड हजार रुपये दिले जातात. यामधील अनेक घोटाळे देखील उघड झाले आहेत. त्याचबरोबर पात्र महिलांसाठी नियमावली देखील कडक करण्यात आली आहे.
10 Oct 2025 01:05 PM (IST)
मराठवाड्यात मागसवर्गीय समाज मोठा आहे. ओबीसी हा एक वर्ग आहे. ती जात नाही. त्यात २७४ जाती आहे. कोणत्या एखाद्या जातीसाठी आम्ही लढत नाही. EWS चे आरक्षण जेव्हा दिलं ते खास मराठा समाजासाठी दिलं होतं. आम्ही विरोध केलेला नाही. आमचं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही वेगळं आरक्षण घ्या- छगन भुजबळ
10 Oct 2025 01:05 PM (IST)
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकारण तापू लागले आहे. महाविकास आघाडीनेही निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. तर भाजपचाही आढावा बैठकांचा धडाका सुरु आहे. निवडणुकांच्या दृष्टीने काँग्रेसने नुकतीच उत्तर महाराष्ट्रात बैठक घेतली. या बैठकीत मनसेला सोबत घेण्याबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
10 Oct 2025 12:55 PM (IST)
माणिकराव कोकाटे यांच्याकडे पक्षाकडून मोठी जबाबदारी, नाशिक, धुळे आणि जळगाव जिल्ह्याचे माणिकराव कोकाटे संपर्कमंत्री
10 Oct 2025 12:45 PM (IST)
मनोज जरांगे सातत्याने माझ्याबद्दल बोलतात. ते माझ्याबद्दल अपशब्द वापरतात. म्हणून मी त्यांच्याबद्दल बोलतो. नाहीतर मला त्यांच्याबद्दल बोलण्याचे काहीही घेणंदेणं नाही. आम्ही कोणालाही शिव्या शाप देत नाही. रस्त्यावर मारामारी करत नाही. उलट आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली जाते. आम्ही सरकारला सांगतोय की हे चुकीचं सुरु आहे हे सांगतोय, पण जर सरकार ऐकत नसेल तर मग आमच्यापुढे दुसरा पर्याय कोर्टाचा आहे. तिथे लोकशाही पद्धतीने आम्ही गेलो आहोत, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
10 Oct 2025 12:35 PM (IST)
राज्य सरकारने जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी जाहीर केलेल्या शासन निर्णयात (GR) यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि उमरखेड या दोन तालुक्यांचा समावेश केलेला नाही. विशेष म्हणजे, या दोन्ही तालुक्यांमध्ये अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. पीक आणि मालमत्तेचे मोठे नुकसान होऊनही त्यांना मदत यादीतून वगळल्याने शेतकरी आणि स्थानिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. सरकारने तातडीने या त्रुटीची दखल घेऊन सर्वाधिक नुकसान झालेल्या महागाव आणि उमरखेड तालुक्यांचा समावेश मदत यादीत करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
10 Oct 2025 12:29 PM (IST)
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाने क्रिडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. कोकाटे यांची नाशिक, धुळे आणि जळगाव या तीन जिल्ह्यांसाठी संपर्कमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नसतांना आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ स्वतः नाशिकचे असून इच्छुक असतांनाही, पक्षाने नाशिकच्या संपर्कमंत्री पदासाठी कोकाटेंना पसंती दिली आहे. पक्ष संघटना मजबूत करणे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश पक्षाकडून कोकाटे यांना देण्यात आले आहेत.
10 Oct 2025 12:15 PM (IST)
पंजाबमधील चंदीगडमध्ये साताऱ्यातील जवानाचा कर्तव्यावर असताना ह्रदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला. शहीद जवान यांचे पार्थिव विमानाने आज पहाटे पुण्यात दाखल झाले. रूग्णवाहिकेतून त्यांचा मृतदेह कराडला आणला आहे. त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
10 Oct 2025 12:05 PM (IST)
केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी बंदुकी धाक दाखवत लाखो रुपये आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे साहित्य लुटून नेल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पाच दरोडेखोर असल्याची माहिती संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करत तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जळगावमधील महामार्ग क्रमांक सहावर रक्षा खडसे यांचा पेट्रोल पंप आहे.
10 Oct 2025 12:00 PM (IST)
नवीन वाळू धोरणानुसार, घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांना 10 टक्के मोफत वाळू मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गरिबांच्या घरकुलाला वाळू मिळण्यासाठी सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. लिलाव धारकांचा आर्थिक बोजा आता सरकार उचलणार आहे. राज्यातील वाळू व्यवस्थापन व घरकुल योजनांना गती देण्यासाठी बदल करण्यात आला आहे. तीन वर्षांतून एकदा होणारा लिलाव आता दरवर्षी होणार आहे. खाणकाम आराखडा, पर्यावरण परवानगी आणि इतर आवश्यक परवानग्या दरवर्षी घ्याव्या लागणार आहे.
10 Oct 2025 11:50 AM (IST)
उत्तर प्रदेशातील अयोध्या जिल्ह्यातील पगला भारी गावात गुरुवारी संध्याकाळी एका घरात झालेल्या स्फोटात संपूर्ण घर जमीनदोस्त झाले. पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुले आणि दोन प्रौढांचा समावेश आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आणि शोकग्रस्त कुटुंबांना सहानुभूती व्यक्त केली.
10 Oct 2025 11:40 AM (IST)
संजय राऊत यांनी कदम यांच्यावर पुन्हा निशाणा साधला. मला असं वाटतं की रामदास कदम यांनी जी थुंकी उडवली आहे, ती त्यांना गिळावीच लागेल. अनिल परब यांनी अत्यंत व्यवस्थितपणे एक भूमिका मांडली आहे. रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री असलेल्या त्यांच्या चिरंजीवांनी जे घोटाळे, गुन्हे करून ठेवले आहेत. त्यांनी जे विषय मांडले. ही चिंतेची गोष्ट आहे. अशा पद्धतीने मंत्री जर काम करत असतील तर देवेंद्र फडणवीस हे कॅबिनेट चालवत नसून गुंडांची टोळी चालवत आहेत, असा घणाघाती हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
10 Oct 2025 11:30 AM (IST)
सप्टेंबर 2025 च्या हप्त्याची प्रतिक्षा संपली आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यात उद्यापासून रक्कम जमा करण्यात येणार आहे. याविषयीची घोषणा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर याविषयीची घोषणा केली. या घोषणेमुळे महिलांना आनंद होणार आहे.
10 Oct 2025 11:25 AM (IST)
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला काय नाव द्यावे यावर कारस्थाने सुरू आहेत. अदाणी यांचे मत कोणतेच नाव देऊ नये, म्हणजे अदाणी एयरपोर्ट म्हणून ते ओळखले जाईल, नरेंद्र मोदी यांचे नाव विमानतळास द्यावे अशीही त्यांची इच्छा दिसते. तसेच स्व.दि.बा. पाटील यांचे नाव देण्यास भाजपाचा विरोध दिसतोय!, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
10 Oct 2025 11:15 AM (IST)
बॉलीवुड अभिनेत्री रेखा यांनी सादगी आणि नृत्याविष्कार यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले. अनेक बॉलीवुड आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. १९८० च्या ‘फटाकडी’ या मराठी चित्रपटातील त्यांच्या लावणीनृत्याने त्यांना विशेष ओळख मिळवून दिली. याशिवाय, रेखा राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले आहे. त्यांना अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाले आहेत. त्यांची प्रेमकथा, साड्यांवरील प्रेम, अभिनय आणि उर्दू भाषेवरील प्रभूत्व यामुळे रेखा आपले वेगळेपण जपून आहेत.
10 Oct 2025 11:15 AM (IST)
मुळशीतील धरणग्रस्त भागातील मतदार यादीतून तब्बल ९८८ मतदारांची नावे गायब झाली आहेत. या प्रकरणी शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे.
10 Oct 2025 11:10 AM (IST)
फिलीपिन्सच्या मिंडानाओ प्रदेशात ७.४ तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती समोर आली आहे. इतक्या शक्तीशाली भूकंपानंतर स्थानिक अधिकाऱ्यांन त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. तसेच भूकंपानंतर पुन्हा धक्के बसण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. युरोपियन-भूमध्य भूकंप केंद्र (EMSC) नुसार, भूकंपाची खोली ६२ किलोमीटर (३८.५३ मैल) होती. स्थानिक अधिकाऱ्यांनी किनारी भागात राहणाऱ्या लोकांना उंच जमिनीवर जाण्याचा सल्ला दिला आहे. आपत्कालीन सेवा सतर्क आहेत आणि नागरिकांना सरकारी सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
10 Oct 2025 11:04 AM (IST)
खडकवासला विधानसभा मतदारसंघात ‘राष्ट्रवादी परिवार मिलन’ अभियानांतर्गत राजीव गांधी नगर, राजगड चाळ परिसर आणि बिबवेवाडीत पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेटीगाठी घेतल्या. या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातील पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा वर्ग आणि ज्येष्ठ नागरिकांशी पवार यांनी संवाद साधला.
10 Oct 2025 10:52 AM (IST)
भारताला स्पर्धेतील पहिला पराभव चाखावा लागला आहे आणि या पराभवासह, टीम इंडियाने नंबर-१ स्थान गमावले आहे. भारत दक्षिण आफ्रिकेसह पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर आहे, तर इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे. महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ मध्ये दक्षिण आफ्रिकेची सुरुवात निराशाजनक झाली. इंग्लंडने पहिल्या सामन्यात त्यांना ६९ धावांत गुंडाळले आणि १० विकेट्सने पराभूत केले. तथापि, आफ्रिकन संघाने जोरदार पुनरागमन केले, न्यूझीलंड आणि नंतर भारताला हरवून अव्वल चारमध्ये स्थान मिळवले.
10 Oct 2025 10:44 AM (IST)
दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी लॉरा वोल्वार्ड आणि ताजमिन ब्रिट्स मैदानावर आली. भारताचा तिसरा षटक क्रांती गौडने टाकला. तिने दुसरा चेंडू ताजमिन ब्रिट्सला टाकला. ब्रिट्स पुढे सरकली आणि एक शॉट खेळली. यादरम्यान क्रांती गौड पडली आणि एक शानदार झेल घेतला. ती फॉलो-थ्रूमध्ये पडली. असा झेल घेणे सहसा खूप कठीण असते. तथापि, गौडने तिचा तोल राखला आणि एक शानदार झेल घेतला. गौडने या सामन्यात नऊ षटके टाकली, ५९ धावा दिल्या आणि दोन फलंदाजांना बाद केले.
10 Oct 2025 10:34 AM (IST)
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा एका महिलेनं प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
10 Oct 2025 10:22 AM (IST)
संदीप रेड्डी वांगा यांच्या “स्पिरिट” या चित्रपटात दीपिका पदुकोणने दिवसाला आठ तास काम करण्याची अट घातली होती. तिला तिच्या मुलीच्या संगोपनासाठी अधिक वेळ द्यायचा होता. यामुळे तिला चित्रपटातून काढून टाकण्यात आले. परंतु, दीपिका या विषयावर बोलत राहते. अलिकडच्याच एका मुलाखतीत तिने तिच्या आठ तासांच्या कामाच्या वेळापत्रकाचे समर्थन केले आणि बॉलीवूडच्या वर्क कॅल्चरबद्दलही प्रश्न उपस्थित केले.
10 Oct 2025 10:16 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने फ्री फायर मॅक्समध्ये नवीन डार्कनेस इन बरमुडा ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या जबरदस्त ईव्हेंटमध्ये गोल्ड रॉयल वाउचर आणि वॉइस पॅक रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. याशिवाय, या ईव्हेंटमध्ये दिवाळी फटाकेवाला ग्रेनेड देखील दिला जाणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व आयटम्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करण्याची गरज नाही. जर तुम्हाला देखील या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला गेममधील हा ईव्हेंट आणि त्याच्या रिवॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत.
10 Oct 2025 10:09 AM (IST)
टीव्ही जगतातून मोठी बातमी समोर येत आहे. रश्मी देसाईचा एक्स पती नंदीश संधूचा साखरपुडा झाला आहे. तो “उत्तरन” या लोकप्रिय मालिकेसाठी ओळखला जातो. त्याच शोमध्ये तो रश्मी देसाईला भेटला आणि नंतर दोघांनी मोठ्या धुमधडाक्यात लग्न केले. परंतु, त्यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि दोन वर्षांतच ते तुटले. आता, नंदीश पुन्हा एकदा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आला आहे. त्याने अभिनेत्री कविता बॅनर्जीशी त्याच्या साखरपुड्याची घोषणा केली आहे.
10 Oct 2025 09:58 AM (IST)
फ्री फायर मॅक्समध्ये दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या सणानिमित्ताने फ्री फायर मॅक्समध्ये नवीन डार्कनेस इन बरमुडा ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या जबरदस्त ईव्हेंटमध्ये गोल्ड रॉयल वाउचर आणि वॉइस पॅक रिवॉर्ड्स म्हणून मिळणार आहे. याशिवाय, या ईव्हेंटमध्ये दिवाळी फटाकेवाला ग्रेनेड देखील दिला जाणार आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे हे सर्व आयटम्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड खर्च करण्याची गरज नाही. जर तुम्हाला देखील या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स जिंकायचे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी फायद्याची ठरणार आहे. आता आम्ही तुम्हाला गेममधील हा ईव्हेंट आणि त्याच्या रिवॉर्ड्सबद्दल सांगणार आहोत.
10 Oct 2025 09:50 AM (IST)
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. त्यानुसार, प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील नावे आता संकेतस्थळावर (वेबसाईट) शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
10 Oct 2025 09:40 AM (IST)
ऋषभ शेट्टी यांचा “कांतारा: चॅप्टर १” हा कन्नड चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपवादात्मक कामगिरी करत आहे. दोन दिवसांतच या चित्रपटाने १०० कोटींचा टप्पा ओलांडला. सातव्या दिवशी “कांतारा: चॅप्टर १” हा चित्रपट ३०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला. गुरुवारी त्याच्या कमाईत थोडीशी घट झाली असली तरी, “कांतारा: चॅप्टर १” बॉक्स ऑफिसवर अजूनही स्थिर आहे. ऋषभ शेट्टीच्या चित्रपटाने भारतात आतापर्यंत किती कोटींची कमाई केली आहे ते जाणून घेऊया.
10 Oct 2025 09:30 AM (IST)
भारतात 10 ऑक्टोबर रोजी 24 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 12,416 रुपये, 22 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 11,381 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति ग्रॅमचा दर 9,312 रुपये आहे. भारतात 10 ऑक्टोबर रोजी 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,13,810 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 1,24,160 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 93,120 रुपये आहे. भारतात आज चांदीचा भाव प्रति ग्रॅम 167.10 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 1,67,100 रुपये आहे.
10 Oct 2025 09:20 AM (IST)
काबुल : अफगाणिस्तानात पाकिस्तानकडून ‘एअर स्ट्राईक’ करण्यात आल्याची माहिती दिली जात आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये एकामागून एक स्फोट झाल्याचे पाहिला मिळाले. काबुलच्या अब्दुल हक स्क्वेअरजवळ हा स्फोट झाला, जिथे एका लँड क्रूझर वाहनाला लक्ष्य करण्यात आले. या घटनेनंतर अब्दुल हक स्क्वेअर बंद होता, ज्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली, असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.
10 Oct 2025 09:10 AM (IST)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. एमपीएससीने भरती प्रक्रियेत निर्णायक बदल करत, उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी आता मुलाखतीच्या वेळी नव्हे, तर अर्ज सादर करण्यापूर्वीच करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयोगाने यासंदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. या नव्या पद्धतीमुळे खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या प्रकरणांना आळा बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.एमपीएससीच्या भरती प्रक्रियेत अनेक उमेदवार विविध आरक्षण श्रेणींचे दावे करतात. यापुढे अशा प्रत्येक दाव्यासाठी अर्ज करतानाच संबंधित पुरावा सादर करणे अनिवार्य असणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
10 Oct 2025 09:07 AM (IST)
India vs West Indies Toss Update : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये दुसरा सामन्याला सुरुवात झाली. भारताच्या संघाने वेस्टइंडीज विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यांमध्ये विजय मिळवून मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार शुभमन गिल याने अनेक जिंकून पहिले फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला सामन्यामध्ये भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजा याने शतक झळकावले होते त्याचबरोबर के एल राहुल याने देखील दमदार खेळी खेळून शतकीय खेळी खेळली होती.
10 Oct 2025 08:52 AM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद सदस्य इद्रिस नायकवडी यांच्या वाहनावर मिरज पूर्व भागात दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. जानराववाडी गावाजवळ दोघा अज्ञातांनी आमदार नायकवडी यांच्या गाडीवर पाठीमागून दगड मारला. या दगडफेकीत आमदार नायकवडी यांच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाले आहे. मात्र, यावेळी आमदार नायकवडी हे या वाहनांमध्ये नव्हते ते माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्या वाहनामध्ये बसले होते. पण, आमदारांच्या वाहनावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेने एकच खळबळ उडाली.
10 Oct 2025 08:50 AM (IST)
“माझी आई राजकारणात नाही, ती फक्त समाजकारण करते. तिच्या स्वभावाबद्दल विरोधकांनाही माहीत आहे की त्या अतिशय साध्या आणि सरळ आहेत. तरीसुद्धा भाजप तिचा फोटो वापरून गलिच्छ राजकारण करत आहे. याचा सरळ अर्थ असा की, मला समोर जायला भाजप घाबरते,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.
रोहित पवार म्हणाले, “भाजप आज कोणत्या पातळीवर जात आहे हे पाहून धक्का बसतो. माझ्या आईला या राजकारणाशी काहीही देणंघेणं नाही. ती केवळ समाजकारण करते. इथं जरी विरोधक तिच्या बाजूला उभे राहिले तरी तिला राजकीय हेतू समजणार नाहीत. पण भाजपकडून तिचा फोटो वापरून अशा नीच पातळीचे राजकारण केले जात असेल, तर ते त्यांच्या भीतीचे द्योतक आहे.”
10 Oct 2025 08:47 AM (IST)
भारतीय महिला संघाचा विश्वचषकाचा तिसरा सामना काल साउथ आफ्रिकेविरुद्ध पार पडला. या सामन्यांमध्ये भारताच्या संघाने पहिले फलंदाजी करून निराश केले. ऋचा घोष हिच्या जोरावर टीम इंडियाने 251 धावांचे लक्ष उभे केले होते. लॉरा वॉलवर्ट आणि नॅडिन डी क्लार्क यांच्या खेळीने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजय मिळवून दिला. ऋचा घोष खेळलेली 94 धावांची खेळी व्यर्थ ठरली. एकेकाळी भारताच्या हातात असलेला विजय शेवटच्या षटकांत निसटला. दक्षिण आफ्रिकेसाठी नॅडिन डी क्लार्कच्या धमाकेदार फलंदाजीने सामन्याचे चित्र उलगडले.
10 Oct 2025 08:46 AM (IST)
१० ऑक्टोबर रोजी आज भारतीय शेअर बाजारात घसरण होण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील कमकुवतपणा लक्षात घेता, भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, आज १० ऑक्टोबर रोजी, शुक्रवारी घसरणीसह उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात मंदावल्याचे दर्शवितात. गिफ्ट निफ्टी २५,२६२ च्या आसपास व्यवहार करत होता, जो निफ्टी फ्युचर्सच्या मागील बंदपेक्षा जवळजवळ १२ अंकांनी कमी होता.
10 Oct 2025 08:46 AM (IST)
राज्यातील लाडक्या बहिणींना मोठी दिलासादायक बातमी मिळाली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले आहे की, ‘लाडकी बहिण’ योजनेअंतर्गत लाभार्थींच्या खात्यात आजपासून १५०० रुपयांच्या सन्मान निधीची रक्कम जमा होऊ लागली आहे.
तटकरे यांनी यासंदर्भात सोशल मीडियावर ट्विट करत माहिती दिली. “राज्यातील पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात पुढील दोन ते तीन दिवसांत सन्मान निधी वर्ग केला जाईल,” असे त्या म्हणाल्या. राज्य सरकारच्या या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळणार असून, अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.
Marathi Breaking news live updates: कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडचे भाजप आमदार शिवाजी पाटील यांना हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा एका महिलेनं प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा नोंदवला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाटील यांना गेल्या काही दिवसांपासून एका अनोळखी महिलेचे विविध क्रमांकांवरून संदेश आणि आक्षेपार्ह फोटो येत होते. त्यानंतर त्या महिलेनं त्यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर पाटील यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. हा प्रकार ठाण्यातील हिरानंदानी मेडोज परिसरातील त्यांच्या कार्यालयाशी संबंधित असल्याचे समजते. चितळसर पोलिसांनी या घटनेचा सविस्तर तपास सुरू केला आहे.