मतदारांची नावे आता पाहता येणार वेबसाईटवर;
मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता लवकरच होणार आहेत. त्यानुसार, प्रशासनाकडून जोरदार तयारी केली जात आहे. जिल्हा परिषदा, पंचायत समित्या आणि नगरपरिषदा, नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रारूप मतदार यादी 8 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीतील नावे आता संकेतस्थळावर (वेबसाईट) शोधण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने एक जुलै हा अधिसूचित दिनांक निश्चित केला आहे. त्या दिवशी अस्तित्वात असलेली विधानसभेची मतदारयादी या निवडणुकांसाठी वापरण्यात येत आहे. त्या आधारे तयार करण्यात आलेल्या जिल्हा परिषद निवडणूक विभाग व पंचायत समिती निर्वाचक गणनिहाय; तसेच नगरपरिषद-नगरपंचायतीसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी स्वतंत्र संकेतस्थळाची लिंक राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे.
हेदेखील वाचा : Maharashtra Politics: महायुतीमध्येच नेत्यांची चोरी; निवडणुकीआधी एकनाथ शिंदेंना धक्का; ‘या’ बड्या नेत्याने सोडली साथ
दरम्यान, जिल्हा परिषद व पंचायत समितीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयात उपलब्ध असेल, नगरपरिषद व नगरपंचायतीची प्रारूप मतदार यादीची छायांकित प्रत संबंधित नगरपरिषद व नगरपंचायतीच्या कार्यालयात उपलब्ध असेल. जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगरपरिषदा-नगरपंचायतीतील मतदार यादीसाठी प्रतिपृष्ठ दोन रुपयेप्रमाणे शुल्क भरावे लागेल.
अनेक ठिकाणचं आरक्षण होतंय जाहीर
दुसरीकडे, अनेक ठिकाणी अक्कलकोट तालुक्यातील तीन नगरपालिकेचे नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले. अक्कलकोट नगरपालिकेचे नगराध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आहे. यामुळे सर्वच राजकीय पक्षातून इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. भाजप-महायुती व महाविकास आघाडी यांच्यात स्थानिक पातळीवर युतीमध्ये बिघाडी-बनाव झाल्यास बहुरंगी लढतीच्या दिशेने राजकीय व्यूहरचना गती घेण्याची शक्यता अधिक आहे.
हेदेखील वाचा : कराड नगरपालिकेत नगराध्यक्षपदासाठी खुले आरक्षण; राजकीय मोर्चेबांधणीस सुरुवात, नागरिकांमध्ये उत्सुकता