Photo Credit- Social Media
नवी दिल्ली: शंभू सीमेवरील शेतकरी आंदोलनाला शनिवारी (31 ऑगस्ट 2024) 200 दिवस पूर्ण झाले. विविध मागण्यांसाठी 13 फेब्रुवारी 2024 पासून हजारो शेतकरी त्याठिकाणी आजही आंदोलन करत आहेत. याचदरम्यान, आज सकाळी कुस्तीपटू विनेश फोगाट देखील आंदोलनाच्या स्थळी पोहचली. याठिकाणी शेतकऱ्यांनी विनेशचे स्वागत करत तिचा सन्मान केला.
यावेळी बोलताना विनेश फोगाट म्हणाली, मला राजकारणाबद्दल फारसे माहिती नाही. पण आज शेतकरी सर्वत्र आहेत. गेले कित्येक वर्षे त्यांनी शेतात काम केले आहे. पण प्रत्येकजण नाईलाजातून आंदोलन करत असतो. जेव्हा बराच काळ विरोध होतो. तेव्हा लोकांच्या मनात आशा निर्माण होते. पण जर आपले लोक असे रस्त्यावरच बसले तर त्यांची प्रगती कशी होणार, असा सवालही तिने उपस्थित केला.
हेदेखील वाचा: आता दिल्ली पोलिसांकडूनच मिळणार पैसे; 50 हजार बक्षिस मिळवण्याची संधी
दरम्यान, 13 फेब्रुवारीपासून शंभू सीमेवर सर्व पिकांना MSP च्या कायदेशीर हमीसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी त्यांची दिल्ली पदयात्रा थांबवली होती. पण आता लवकरच खनौरी, शंभू आणि रतनपुरा हद्दीत मोठ्या संख्येने शेतकरी जमा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
अमृतसर जिल्ह्यातील शेतकरी नेते बलदेव सिंह बग्गा म्हणाले की, सरकारशी संवाद साधण्याचा अनेकदा प्रयत्न करण्यात आला, परंतु प्रतिसाद मिळाला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना अनेकदा पत्रेही लिहिली होती, पण तिथूनही उत्तर मिळाले नाही. सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे. तर, 31 ऑगस्ट रोजी शंभू आणि खनौरी पॉइंट येथे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने जमा व्हावे, असे आवाहन किसान मजदूर मोर्चाचे निमंत्रक सर्वनसिंह पंढेर यांनी केले आहे.
हेदेखील वाचा: BJP vs Sharad Pawar NCP पवारांचं ‘ मिशन तुतारी ‘, भाजपचे कोणते नेते गळाला ?
याशिवाय, बॉलीवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत यांच्यावरही कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तिने गेल्या काही काळात केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी समुदायात तिच्याविरोधाच संतापाची भावना निर्माण झाली आहे. तसेच, त्यांनी भारतीय जनता पक्षाला कंगना राणौतच्या विरोधात कठोर भूमिका घेण्याचे आवाहन केले आहे.