पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार; मतदान केंद्रांवर तुफान दगडफेक, मतदार जखमी!

पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची माहिती समोर आली आहे.

  आज लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) पहिल्या टप्प्यातील जागांसाठी मतदान सुरू झाले आहे.  21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 102 जागांसाठी मतदान (Voting) सुरू झालं आहे. या दरम्यान पश्चिम बंगालमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. कूच बिहारमध्ये मतदानादरम्यान हिंसाचार झाला आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. या हिंसाचारात काही जण जखमी झाले आहेत.

  कुठे झाला हिंसाचार

  पश्चिम बंगालमधील कूच बिहारमध्ये मतदान केंद्रावर हिंसाचार झाल्याची माहिती समोर येत आहे. तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचं सांगण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजप पश्चिम बंगालमध्ये सातत्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आव्हान देत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये सतत वाद होत असतात. मतदानादरम्यान चंदमारी येथील बूथजवळ दगडफेक झाल्याच्या माहिती समोर आल्यानंतर परिसरात हिंसाचार उसळला.

  तृणमूल काँग्रेसने घेतला खरपूस समाचार

  तृणमूल काँग्रेसने भाजप खासदार निसिथ प्रामणिक यांच्यावर हिंसाचार घडवल्याचा आरोप केला आणि निवडणूक आयोगावर कथित निष्क्रियतेबद्दल टीका केली. टीएमसीने ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये आरोप केला आहे की, “भाजप खासदार निसिक प्रामाणिक यांच्या कारकिर्दीत कूचबिहार हिंसाचारासाठी ओळखला जाऊ लागला आहे. केंद्रीय राज्यमंत्री गुन्हेगारांना आश्रय देतात आणि त्यांच्या निवासस्थानी बंदुक ठेवतात याविषयी आम्ही वारंवार माहिती आणि तक्रारी देऊनही, निवडणूक आयोगाने याची दखल घेतली नाही.

  ते पुढे म्हणाले, “काल भाजपच्या गुंडांनी आमच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या क्रूर हल्ल्यानंतर आज आणखी एक हल्ला झाला आहे. भाजप नेते रतन बर्मन, अजित महंतो आणि हिरेन महंतो यांनी भेटागुरी-1, दिनहाटा येथील बूथ क्रमांक 232 आणि 231 मध्ये देशी बॉम्ब फेकले. यामध्ये आमचे ब्लॉक अध्यक्ष अनंत कुमार बर्मन गंभीर जखमी झाले.