महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये कोरोनाबाधितांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळत आहेत. कोरोना काळात सेवा देणाऱ्या पोलिसांनाही आता कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. महाराष्ट्र पोलीसांसह मुंबई पोलीस दलातील ४८६ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यासह १८ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
महाराष्ट्रासह मुंबईत कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या नियमांची अंमलबजावणी करताना पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. चौकामध्ये पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पोलीसांनाही कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्राताल ११८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे उपाचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. इतर कोरोनाग्रस्त कर्मचाऱ्यांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत.
पोलीस दलातील काही कर्मचाऱ्यांमध्ये कोरोनाचे लक्षण सौम्य आहेत. यामुळे या कर्मचाऱ्यांना घरीच उपचार देण्यात येत आहे. रविवारी आलेल्या आकडेवारीनुसार गेल्या ४८ तासात मुंबई पोलीस दलातील एकूण ५२३ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. महाराष्ट्रात १८ वरिष्ठ अधिकाऱ्यांसह १३ पोलीस उपायुक्त आणि ४ अतिरिक्त पोलीस आयुक्तांना कोरोनाची लागण झाली आहे. एका सह पोलीस आयुक्तांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
कोरोनाचा शिरकाव शासकीय कार्यालयांसह मंत्र्यांच्या दालनातही झाला आहे. मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईत रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या अधिक असल्यामुळे रोज गर्दी होत असते. या गर्दीत सेवा देणाऱ्या रेल्वे पोलीस आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. रविवारी ६२ रेल्वे कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. रेल्वे कारखाने आणि कार्यालयांजवळ कोरोना चाचणी शिबीरे आयोजित करण्यात होते. यामध्ये ४०० ते ५०० कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. बहुतांश कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यांच्यात सौम्य लक्षणे आहे.