PM मोदींनी का नाकारलं ट्रम्प यांचं आमंत्रण? ओडिशातील सभेत स्वत: केला खुलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या ओडिशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज येथे एका विशाल जनसभेला संबोधित केले. आपल्या भाषणात त्यांनी ओडिशाच्या विकासाची तुलना देशातील इतर राज्यांशी करत “डबल इंजिन सरकार”च्या कामगिरीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं निमंत्रणही ओडिशासाठी नाकारल्याचं म्हटलं आहे.
पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात एका भावनिक आठवणीने केली. त्यांनी सांगितले की, “मी दोन दिवसांपूर्वी कनाडामध्ये G7 शिखर परिषदेसाठी गेलो होतो. तेव्हा अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रंप यांनी मला फोन करून वॉशिंग्टनमध्ये जेवणासाठी आणि चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले. मात्र, मी त्यांना नम्रतेने सांगितले की, मला ओडिशामध्ये महाप्रभूच्या भूमीवर जायचं आहे. त्यामुळे मी त्यांच्या आमंत्रणाचा स्वीकार करू शकलो नाही. “ओडिशावासियांचे प्रेम आणि महाप्रभूची भक्ती मला इथे खेचून घेऊन आली आहे, असं ते म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी काँग्रेसवरही तीव्र टीका केली. “देशाने अनेक दशकं काँग्रेसचे मॉडेल पाहिले. हे मॉडेल अकार्यक्षमतेचे, लटकवण्याचे, अडकविण्याचे होते. सामान्य माणसाचे जीवन सुलभ करणे किंवा पारदर्शकता आणणे, ही त्यांच्या अजेंड्यावर नव्हतं. उलट भ्रष्टाचार हेच त्यांचं ‘विकास’ मॉडेल होतं,” असा आरोप त्यांनी केला. त्यांनी असेही नमूद केले की, “देशातील अनेक राज्यांमध्ये गेल्या काही वर्षांत प्रथमच भाजपची सरकार आली आणि यामुळे तिथे केवळ सत्ताच बदलली नाही, तर सामाजिक आणि आर्थिक परिवर्तनाचा नवा अध्याय सुरू झाला.”
मोदींनी आपल्या भाषणात पूर्व भारतातील राज्यांचे उल्लेख करत भाजपच्या कार्यकाळात झालेल्या बदलांचे उदाहरण दिले. “असममध्ये एक दशक आधीपर्यंत अस्थिरता, हिंसाचार आणि वेगळेपणाची भावना होती. मात्र आज तिथे विकासाची वाट चालली जात आहे. उग्रवादाच्या घटनाही कमी झाल्या आहेत,” असे ते म्हणाले. त्रिपुराच्या बदलाकडे लक्ष वेधत त्यांनी सांगितले की, “वर्षानुवर्षे डाव्या पक्षांच्या राजवटीमुळे त्रिपुरा मागे राहिले होते. आता तिथे शांती, प्रगती आणि जनतेचा सन्मान आहे.”
Amit Shah : “इंग्रजी बोलणाऱ्यांना त्यांची स्वतःची लाज वाटेल…”, भाषेच्या वादात अमित शहांचे मोठे विधान
पंतप्रधान मोदी म्हणाले की, “ओडिशामध्ये अनेक दशकांपासून गरीब आणि शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात आले होते. भ्रष्टाचार, लालफीतशाही आणि विकासाच्या दृष्टीने मागे पडलेले क्षेत्र – हे ओडिशाचे जणू दुःख बनले होते. मात्र गेल्या एका वर्षात भाजपा सरकारने यावर ठोस उपाययोजना केल्या.” त्यांनी ठामपणे सांगितले की, “डबल इंजिन सरकारमुळे इथल्या जनतेला डबल फायदा झाला आहे. प्रत्येक क्षेत्रात काम सुरू आहे – पायाभूत सुविधा, शेती, आरोग्य, शिक्षण आणि रोजगार या सर्व क्षेत्रांत प्रगती होऊ लागली आहे.”