काटेपूर्णा धरण, अकोला जिल्हा
अकोला (Akola). गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांसह धरण क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील जलसाठे वाढत असून, जिल्ह्यातील सर्वात मोठ्या काटेपूर्णा प्रकल्पाचे दहाही दरवाजे उघडण्यात आले. यातून ६ दलघमी पाण्याचा विसर्ग झाला. यापूर्वी ऑगस्ट महिन्यात १५ तासात ९ दलघमी पाणी सोडण्यात आले होते, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली.
काटेपूर्णा प्रकल्पाची साठवण क्षमता ८६.३५ दलघमी आहे. नोव्हेंबर २०१९ मध्ये झालेला संततधार पाऊस आणि यावर्षी सलगपणे सुरू असणारा मुसळधार पाऊस यामुळे प्रकल्प ओव्हर फ्लो होत आहे. जुलै महिन्याच्या अखेरपासून प्रकल्पाचे दरवाजे सातत्याने उघडावे लागत आहेत. वाशीम, मालेगाव, मेडशी आदि परिसरात जोरदार पाऊस झाल्यास काटेपूर्णा प्रकल्पात मुबलक जलसाठा उपलब्ध होतो. 10 सप्टेंबर पहाटे १ वाजेपर्यंत ३५१.४२ घन मीटर प्रती सेंकद, पहाटे १ ते ३ वाजेपर्यंत २५०.८१ घन मीटर प्रती सेंकद, पहाटे ३ ते सकाळी ६ पर्यंत १५०.४८ घन मीटर प्रती सेकंद तर सकाळी ६ ते दुपारी १ वाजे पर्यंत ५०.१६ घन मीटर प्रती सेकंद पाण्याचा विसर्ग झाला. परिणामी रात्री दहा ते दुपारी एक या दरम्यान काटेपूर्णा प्रकल्पातून सहा दशलक्ष घनमीटर पाणी सोडण्यात आले. यापूर्वीही ऑगस्ट महिन्यात ९ दलघमी पाणी सोडण्यात आले होते.