मालवणच्या राजकोटवर पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणा (फोटो सौजन्य-X)
भगवान लोके, कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा 60 फूटी उंच तलवारधारी भव्यदिव्य पुतळा राज्य शासन उभारणार आहे. या पुतळ्यासाठी महाराष्ट्र राज्याच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांनी २० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या डोलाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा राहणार आहे. ही शिवप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.
राज्य शासनाने राजकोट किल्ला येथे शिवछत्रपती महाराज पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल दुरुस्ती करण्याची निविदा प्रसिद्धी पत्रकार प्रसिद्ध केलेली आहे. यासाठी सुमारे 20 कोटी अंदाजे खर्च निश्चित करण्यात आला आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण करण्यासाठी सहा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे. पुतळा कोसळल्यानंतर एका महिन्याच्या आतच ही निविदा राज्य शासनाने जाहीर केल्यामुळे नवीन पुतळ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आता राज्य शासन महत्त्वाची पावले उचलली आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट येथील पुतळा कोसळल्यानंतर पुतळा उभारण्यासाठी एक कमिटी राज्यशासनाने गठीत केली होती. त्या कमिटीच्या अहवालानुसार नवीन पुतळा उभारण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महायुती सरकारने तातडीने हाती घेतले आहे. हा पुतळा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी म्हणून ओळखले जाणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याच्या धर्तीवर उभारण्यात येणार आहे. तो पुतळा उभारण्यासाठी लावलेले निकष डोळ्यासमोर काम करण्यात येणार आहे.
यामध्ये नव्याने उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या च्या कामात यावेळी कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी राज्य शासनाने 500 पेक्षा जास्त पानाचे निकष असणारी निविदा आहे. नवीन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची 100 वर्षे गॅरंटी असणार आहे. 10 वर्षे या पुतळ्याची देखभाल दुरुस्ती त्या ठेकेदाराने करावयाची आहे. 3 फुटाचे फायबर मॉडेल तयार करून हे कलासंचलनांकडून मंजूर करून घ्यावयाचे आहे. आयआयटी पवई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अनुभव असणाऱ्या व्यक्तींना हा पुतळा उभारण्याचे काम देण्यात येणार असल्याचे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आली आहे.