मोहोळ / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मोहोळ येथील दोन शिवसैनिकांच्या खून प्रकरणाचा तपास तांत्रिक गोष्टी तपासून केला जात आहे. या खुनाच्या प्रकरणांमध्ये कोणाचा सहभाग आहे? या कटातील आरोपींच्या कुठे बैठका झाल्या? याबाबत सखोल तपास सुरू असून, फरार असलेले आरोपी तातडीने पोलिसांच्या हाती लागतील, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांनी दिली.
मोहोळ येथे १४ जुलै रोजी रात्री ११ वाजण्याच्या दरम्यान सतीश क्षीरसागर व विजय सरवदे या दोन शिवसैनिकांच्या अंगावर चालक भैय्या असवले याने संगनमताने टेम्पो घालून त्यांचा खून केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रोहित फडतरे, संतोष सुरवसे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे, रमेश उर्फ संदीप गोटू सरवदे व चालक असवले अशा सहा जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रभाकर शिंदे यांच्याकडे आहे. त्यांनी या प्रकरणाबाबत माहिती देताना सांगितले की, हा गुन्हा गंभीर असल्याने तांत्रिक गोष्टींचा अवलंब करून तपास सुरू आहे. यामध्ये रमाई घरकुल योजनेच्या गहाळ फायलींचे प्रकरण, बोगस मतदार नोंदणी याबरोबरच मोहोळ येथील गुरुनाथ मंगल कार्यालयाच्या खरेदी-विक्रीचे प्रकरण या सर्वच अनुषंगाने हा तपास सुरू आहे.
फरार आरोपींच्या शोधासाठी आरोपींच्या नातेवाईकांसह त्यांच्या संपर्कातील सर्व ठिकाणी पोलिसांचे पथक शोध घेत असून, लवकरच आरोपी पोलिसांच्या हाती लागतील, असे सांगत आरोपींच्या संपत्तीबाबत अनुषंगानेही तपास करण्यात येणार आहे.