भाजप शहर सरचिटणीसांचा आत्मदहनाचा इशारा (फोटो- टीम नवराष्ट्र )
आर्थिक स्थिती नसल्याने भाजप उमेदवाराला नाकारले तिकीट
धनश्री तोडकर यांचा आत्मदहनाचा इशारा
भाजपच्या स्थानिक नेतृत्वात उडाली खळबळ
कोल्हापूर: भारतीय जनता पार्टीच्या कोल्हापूर महानगर शहर सरचिटणीस धनश्री सचिन तोडकर यांनी पक्षाकडून उमेदवारी नाकारल्याच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. ३० डिसेंबर) सकाळी ११ वाजता भाजप पक्ष कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा दिल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
धनश्री तोडकर यांनी यासंदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेली अनेक वर्षे आपण भारतीय जनता पार्टीचे काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असून कोणताही पद, प्रतिष्ठा किंवा वैयक्तिक लाभ न पाहता पक्षासाठी सातत्याने कार्यरत आहोत. काही महिन्यांपूर्वी पती कै. सचिन तोडकर यांचे निधन झाले. या दुःखातून सावरत असतानाही पक्षाचे काम कधीही थांबवले नाही. पतीच्या निधनानंतरही एकही पक्षाचा कार्यक्रम किंवा बैठक चुकवली नाही, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी म्हटले आहे की, कोल्हापूर शहरात इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर पक्षाचे कार्यक्रम आयोजित करण्याची जबाबदारी आपण एकटी महिला असूनही समर्थपणे पार पाडली. मात्र आता आर्थिक परिस्थिती अनुकूल नसल्याचे कारण देत पक्षाकडून उमेदवारी नाकारली जात असल्याने आपल्यावर अन्याय होत असल्याची भावना निर्माण झाली आहे.
मी पक्षाच्या विचारधारेशी प्रामाणिक आहे. कोणत्याही परिस्थितीत पक्षाची विचारधारा सोडू शकत नाही. मात्र तिकीट न मिळाल्याने आणि दुसरा कोणताही पर्याय शिल्लक न राहिल्याने मला हा टोकाचा निर्णय जाहीर करावा लागत आहे, असे त्यांनी भावनिक निवेदनात म्हटले आहे.दरम्यान, या प्रकारामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वात अस्वस्थता पसरली असून वरिष्ठ नेत्यांकडून धनश्री तोडकर यांच्याशी संवाद साधण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनही सतर्क झाले असून पक्ष कार्यालय परिसरात खबरदारी घेण्यात येण्याची शक्यता आहे.






