संजय लीला भन्साळींनी (Sanjay Leela Bhansali) ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi) चित्रपटाची योजना आखली आणि जणू आलिया भट्टचं (Alia Bhatt) नशीब चमकण्याचा योग जुळून आला. आलियानंही या चित्रपटात सर्वस्व ओतून काम केल्याचं रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये पहायला मिळतं. नुकतंच आलियाचं ‘ढोलिडा...’ (Dholida Song) हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. काठियावाडी (Kathiawadi Dance) लोकनृत्याचा बाज असलेला डान्स या गाण्यात पाहायला मिळतो. ‘ढोलिडा...’ हे खरं तर गरबा नंबर आहे. या चित्रपटात गंगूबाई बनलेली आलिया ‘ढोलिडा...’ या गाण्यावर अगदी बेभान होऊन नाचल्याचं पाहायला मिळत आहे. अफलातून कॅमेरावर्क लक्ष वेधून घेतं. भन्साळींनीच संगीतबद्ध केलेलं हे गाणं कुमार यांनी लिहिलं आहे. जान्हवी श्रीमांकर आणि शैल हाडा यांनी गायलेल्या या गाण्याची कोरिओग्राफी कृती महेशनं केली आहे. सध्या हे गाणं ट्रेंडिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. ‘गंगूबाई काठियावाडी’ हा चित्रपट २५ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे.