अक्कलकोट : गोव्याची विधानसभा सार्वत्रिक निवडणूक जसजशी अंतिम टप्यात येते आहे, तसतशी मोठी चुरस दिसून येत आहे. गोवा विधानसभा निवडणुकीचे भाजप प्रभारी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना गोव्याच्या प्रचार मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्यांच्यावरकडे मये मतदारसंघाची जबाबदारी सोपवली आहे.
कल्याणशेट्टी हेही ती जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडत आहेत. त्यांनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मये मतदारसंघात ‘होम टू होम’ असा प्रचार केला.
आमदार कल्याणशेट्टी हे गेल्या दीड महिन्याच्या कालावधीत अनेकदा गोव्याला जाऊन आठवडाभर थांबून भाजपची स्थिती व प्रचार यंत्रणा भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत. प्रत्येक वेळी सहा ते सात कार्यकर्ते सोबत नेऊन त्यांनी प्रचारावर भर दिला आहे.
शेवटच्या टप्यात अक्कलकोट येथील पंचवीस युवा कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचारात आघाडी घेतली आहे. प्रचारात होम टू होम प्रचार, छोट्या मोठ्या सभा घेणे, गोव्यातील कार्यकर्त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना सक्रिय करणे, प्रचारात नवनवीन कल्पना वापरणे, प्रत्येक बूथनिहाय आपले दोन कार्यकर्ते नेमून त्याची यंत्रणा कार्यान्वित करणे. स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन प्रचाराचा वेग वाढविणे, आदी बाबींवर त्यांनी लक्ष केंद्रित केले आहे.
आता प्रचाराचे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. आपल्याला दिलेल्या जबाबदारीत कुठली उणीव राहू नये, यासाठी स्वतःला झोकून देऊन पक्षाने टाकलेला विश्वास सार्थ ठरविण्याचा ते आटोकाट प्रयत्न करीत आहेत. दरम्यान बुधवारी गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत ‘होम टू होम’ प्रचार करण्याची संधी आमदार कल्याणशेट्टी यांना मिळाली आहे. कल्याणशेट्टी हे अक्कलकोटमधील ३५ पेक्षा जास्त कार्यकर्ते सोबत घेऊन मेहनत घेत आहेत.