संग्रहित फोटो
जिल्हा परिषदेवर सध्या प्रशासक राजवट असून, निवडणूक जाहीर होताच राजकीय समीकरणे अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्हा परिषदेमध्ये एकूण ७३ सदस्य पदे आहेत. ही सदस्य पदे जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील गटांमध्ये विभागण्यात आली आहेत. हवेली, खेड, मुळशी, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, दौंड, मावळ, पुरंदर, भोर, बारामती, इंदापूर आणि वेल्हे या तालुक्यांमधून हे गट निश्चित करण्यात आले आहेत. गट रचनेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग तसेच महिलांसाठी आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे उमेदवार निवड आणि युतीची गणिते अधिक गुंतागुंतीची ठरणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य गेल्या अनेक वर्षांपासून पुणे जिल्हा परिषदेवर आहे. या निवडणुकीत महापालिका निवडणुकीप्रमाणे, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढण्याची शक्यता आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांना भाजपमध्ये आणून, भाजपचा झेंडा सासवड नगर परिषदेवर फडकविण्यात भाजपला यश मिळाले आहे, त्याचबरोबर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांना देखील भाजपमध्ये आणून भोर नगरपरिषद ताब्यात घेण्यात भाजपला यश मिळाले आहे, मात्र त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा नगराध्यक्ष निवडून आल्याने भाजपची नगराध्यक्ष पदाबाबत पीछेहाट झाली आहे. या दोन तालुक्यांसह अन्य तालुक्यात देखील भाजपने विशेष लक्ष घातल्याचे दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुणे जिल्हा परिषदेतील वर्चस्वाला आव्हान देण्याची तयारी भाजपसह अन्य विरोधी पक्षांनी सुरू केल्याचे दिसून येत आहे.
पुणे जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या मोठी असून, ग्रामीण भागातील मतदार जिल्हा परिषद निवडणुकीत निर्णायक भूमिका बजावतात. शेती, पाणी प्रश्न, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर मतदारांचा कल ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक पक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी जोरदार तयारी करत आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या निवडणुकीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती करून पुणे जिल्हा परिषद निवडणूक एकत्र लढवण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. ही युती प्रत्यक्षात आली तर अजित पवार यांची बाजू भक्कम होण्याची शक्यता आहे. मात्र भाजपची संभाव्य ताकद मोठी आव्हानात्मक धरण्याची शक्यता आहे. निवडणूक जाहीर होताच उमेदवारांची चाचपणी, गटनिहाय समीकरणे आणि युती–आघाड्यांचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.






