फोटो सौजन्य- X
बांगलादेशामध्ये झालेल्या सत्तापालटानंतर नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील अंतरिम सरकार उद्या दिनांक 8 ऑगस्ट रोजी स्थापन होणार आहे. उद्या रात्री 8 वाजता मोहम्मद युनुस बांग्लादेशाचे प्रमुख म्हणून शपथ घेणार आहे. बांग्लादेशाचे लष्करप्रमुख जनरल वकार-उझ-जमान यांनी ही माहिती दिली. आज (दि 7 ऑगस्ट) पत्रकार परिषदेला संबोधित करताना जनरल वकार म्हणाले की, अंतरिम सरकार गुरुवारी रात्री 8 वाजता शपथ घेऊ शकते. सल्लागार समितीमध्ये 15 सदस्य असू शकतात, तोपर्यंत मोहम्मद युनूस यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
मोहम्मद युनुस यांनी दिला मोठा संदेश
अर्थतज्ञ युनूस हे पदभार स्वीकारण्यासाठी पॅरिसहून मायदेशी परतण्याची शक्यता आहे. मोहम्मद युनूस यांनी बुधवारी सर्वांना “शांतता राखण्याचे” आणि “सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून दूर राहण्याचे” आवाहन केले. युनूस म्हणाले की, “या नवीन विजयाचा आपण सर्वोत्तम उपयोग करूया. आमच्या कोणत्याही चुकीमुळे हा विजय व्यर्थ जाऊ देऊ नका.”
दुसरीकडे सध्या भारतामध्ये असणाऱ्या शेख हसीना यांना लंडनमध्ये आश्रय न मिळाल्याने, यूएई, सौदी अरेबिया किंवा फिनलंडला जाऊ शकतात, असा दावा द हिंदूने आपल्या वृत्तात केला आहे.
बांग्लादेशात अराजकता
शेख हसीना यांनी बांगलादेश सोडल्यानंतर बांगलादेशाची संसद विसर्जित करण्यात आलेली आहे. राष्ट्राध्यक्ष मोहमद शहाबुद्दीन यांनी हा निर्णय घेतला आहे. मात्र, बांगलादेशातील आंदोलनामागे असलेल्या विद्यार्थी संघटनांनी देशात लष्करी शासन लागू करण्यास विरोध केला आहे. मंगळवारी आंदोलकांनी सार्वजनिक वस्तूंची तोडफोड केली. तसेच संतप्त आंदोलकांनी काही लोकांच्या घरांनाही आग लावली. यामध्ये क्रिकेटपटूंच्या घराचाही समावेश आहे.
बांगलादेशातील या आंदोलकांनी मेहरपूर येथील इस्कॉन मंदिर पेटवून दिले. आंदोलकांनी तोडफोडीनंतर मंदिराला आग लावली. बांगलादेशातील आंदोलकांकडून 27 जिल्ह्यात प्रामुख्याने अल्पसंख्याक हिंदू समाजाची घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले. त्यांच्या घरातील किंमती वस्तूही चोरून नेल्या.