मुंबई : आगामी निवडणूकांपूर्वी राज्यातील दोन्ही आघाडींमध्ये जागावाटपावरुन बिघाडी झाली असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, महायुतीमधील शिंदे गट व भाजप यांच्या नेत्यांमध्ये ‘तू तू मैं मैं’ सुरु झाले आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी काही दिवसांपूर्वी भाजप पक्षाबाबत वक्तव्य केले होते. यावर देवेंद्र फडणवीसांकडून त्यांना उत्तर देण्यात आलेलं होतं. त्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी फडवीसांना प्रत्युत्तर दिलं. हा वाद संपलेला नसून नारायण राणे यांनी रामदास कदम यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
काय म्हणाले होते रामदास कदम?
मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून माझ्या मुलाला त्रास दिला जातोय, असं म्हणत रामदास कदम यांनी भाजपवर टीका केली होती. भाजपमधील काही लोक अतिशय घृणास्पद काम करत आहेत. राज्यातल्या काही नेत्यांना मोदी-शाहांनी समज दिली पाहिजे. प्रत्येकालाच आपला पक्ष वाढवायचा असतो. त्यामुळे तुमच्यावर विश्वास ठेवून आलेल्यांचा केसाने गळा कापू नका, असा इशारा कदमांनी दिला होता.
आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे , त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची…
— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) March 8, 2024
नारायण राणेंचं ट्वीट
भाजप नेते नारायण राणे यांनी देखील शिंदे गट व भाजपच्या या वादामध्ये उडी घेतली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी शिंदे गटाला सुनावले आहे. ”आमचे मित्रपक्ष व सहकारी यांच्या गळ्यात हार पडावे, त्यांचा सन्मान व्हावा यासाठी भारतीय जनता पक्ष नेहमी कार्यरत असतो. आम्ही केसाने गळा कापत नाही. केसाने गळा कापणारे आता रानोमाळ फिरत आहेत. आपणच आपले नाव घेऊन काय उपयोग? जनमानसात आपले नाव असले पाहिजे. फांदीवर बसलेल्यांनी आव्हानाची भाषा करु नये, नाही तर आपल्याच फडफडीने फांदी तुटून राम राम म्हणण्याची वेळ येईल.” असं खरमरीत उत्तर नारायण राणे यांनी रामदास कदम यांना दिलं आहे.