रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं..?: अनिल परबांचा रामदास कदमांवर पलटवार
Anil Parab and Ramdas Kadam: शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूविषयी सनसनाटी दावा केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी कदमांवर त्याच सडेतोड भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदमांच्या बायकोने जाळून घेतलं की तिला जाळलं, याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी अनिक परब यांनी केली आहे. पण परब यांच्या या मागणीमुळे शिंदे गट आणि ठाकरे गटात पुन्हा नव्या वादाची ठिणगी पडणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
मुंबई आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना परब म्हणाले, ” १९९३ साली रामदास कदम यांच्या बायकोसोबत नेमकं काय झालं होतं, तिने स्वत:ला जाळून घेतले की तिला जाळण्यात आले, यासाठी रामदास कदमांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. रामदास कदमांनी कोणाकोणाला बंगले बांधून दिले, त्यावरून काय काय राजकारण झाले हे सगळ्यांना माहिती आहे. रामदास कदम यांची नार्को टेस्ट शक्य नसेल तर त्यांचे पुत्र गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी त्यांच्या बापाच्या उद्योगांची चौकशी करावी, असंही परब यांनी म्हटलं आहे.
रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यामध्ये नीचपणाचे वर्तन केले, यावर उत्तर देण्याची गरज आपल्याला नव्हती, परंतु पोरी बाळी नाचवणाऱ्या व्यक्तीस उत्तर देणे आवश्यक ठरले, अशी टिकाही त्यांनी केली. बाळासाहेब यांचा मृत्यू झाल्या त्यावेळी मी विभागप्रमुख असल्यामुळे सगळी जबाबदारी माझ्याकडे होती. २४ तास मी तिथे होतो, त्यावेळी जे काही घडलं मी त्याच्या साक्षीदार होतो. पण बाळासाहेब गेल्यानंतर १४-१५ वर्षांनी रामदास कदमांना कंठ का फुटला असा सवालही अनिल परब यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर हे रामदास कदम मंत्री झाले, उद्धव ठाकरेंनी त्यांना मंत्रीपद दिलं. मग उद्धव ठाकरेंविषयी त्यांना जी तक्रार होती, त्यावेळी त्यांनी ती का केली नाही, गेली 12 वर्षे त्यांच तोंड का बंद होतं? असा प्रश्न अनिल परब यांनी विचारला.
अखेर युद्ध संपणार! गाझातील योजनेला हमासची मंजुरी मिळताच ट्रम्पचे इस्रायलला हल्ले थांबवण्याचे आदेश
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत केलेला दावा शंभर टक्के खोटा असल्याचे अनिल परब यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले, “बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती. कुठलाही मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? प्रेससमोर असा प्रश्न उपस्थित करतो. ही गोष्ट न समजण्याइतकी रामदास कदम यांची अक्कल गुडघ्यात गेली आहे का? कुणी काही सांगितले तरी त्यांनी विचार करायला हवा होता. किंवा बोलण्यापूर्वी तरी विचार करायला हवा होता.कुठले इंजेक्शन दिले, काहीही केले तरी मृतदेह दोन दिवस शवपेटीशिवाय ठेवणे शक्यच नाही. त्यामुळे कदम यांचा दावा पूर्णपणे आधारहीन आहे,” असे परब यांनी ठामपणे सांगितले.