(फोटो- istockphoto)
नवी दिल्ली: भारत आणि चीन यांच्यातील सीमावाद आणि त्यावरून असलेला तणाव हा कायमच बघायला मिळतो. भारताला सर्वाधिक धोका हा चीन आणि पाकिस्तानकडून असल्याचे म्हटले जाते. त्यात अरूणाचल प्रदेश आणि पूर्व लडाखमध्ये कायमच चीन भारताच्या सीमेत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान आता भारताच्या परराष्ट्र धोरणाला आणि मुत्सद्देगिरीला यश आले आहे. भारताच्या धोरणामुळे भारत चीन सीमा संघर्ष सुटण्याची शक्यता आहे. चीनने पूर्व लडाखमधील सैन्य मागे घेतले आहे. याबाबतची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
भारत चीन यांच्यात सीमावाद कायम आहे. अनेकदा दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद मिटू शकलेला नव्हता. मात्र आता कुठेतरी हा वाद संपण्यास सुरूवात झाली आहे, असे चित्र पाहायला मिळत आहे. पूर्व लडाखमध्ये चीनने आपले सैन्य मागे घेतले आहे. लडाखमधील गलवान व्हॅलीसह चार ठिकाणांवरील सैन्य मागे घेतल्याचे चीनने सांगितले. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर चीनने सैन्य मागे घेतल्याची माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले, ‘दोन्ही देशांच्या सैन्याने चार ठिकाणांवरून माघार घेतली आहे. भारत चीन सीमेवर परिस्थिती स्थिर आहे. दोन्ही देशांच्या सैन्यांनी पश्चिम भागातील चार सेक्टरमधून माघार घेतली आहे. ज्यामध्ये गलवान व्हॅलीचा समावेश आहे. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सांगितले, चीनसोबत सैन्य माघारीसंदर्भात संबंधित समस्यांपैकी ७५ टक्के सोडवण्यात आल्या आहेत. मात्र सीमेवरील वाढते लष्करीकरणं हा मोठा आणि गंभीर मुद्दा आहे.
भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात झालेल्या चर्चेचा तपशील देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले, चीन आणि भारत या दोन्ही देशांमध्ये स्थिरता हे नागरिकांच्या हिताचे आहे. यामुळे दोन्ही देशांच्या प्रादेशिक भागांमध्ये शांतता राहणार आहे. परस्पर सामंजस्य राखणे, विश्वास वाढवणे, सतत संवाद राखणे आणि द्विपक्षीय संबंधांना चालना देणे या सर्व मुद्द्यांवर भारत आणि चीन सरकार भर देणार आहे. भारत आणि चीनने पूर्व लडाखमधील सैन्य माघारी घेण्याचे ठरवले होते असे, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले.