सातारा : राज्यात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत (Coronavirus Patients Increases) असल्याने राज्य शासनाने खबरदारीसाठी विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली. मुंबई-पुण्यात पुन्हा हॉटस्पॉट होण्याची शक्यता असल्याने दोन्ही शहरांसाठी कडक नियमावली समोर येणार आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या बैठकीत या नियमावलीवर विचार करण्यात आला. यानंतर साताऱ्यातील दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाची माहिती दिली आहे.
राज्यातील १० मंत्री आणि जवळपास २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यानंतर आज साताऱ्यात त्यांनी राज्यातील काही भागात लॉकडाऊन लागण्याचे संकेत दिले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली, तर राज्य सरकारला कठोर निर्णय घ्यावा लागेल. या संदर्भात मुख्यमंत्री जो निर्णय घेतील, त्याची अंमलबजावणी सर्व भागात केली जाईल, असं उपमुख्यमंत्री म्हणाले.
पश्चिम बंगालमध्ये रुग्णांची संख्या वाढल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही लॉकडाऊन केला आहे. देशातील अनेक राज्यांत सध्या रात्रीची संचारबंदी सुरू आहे. दिल्ली, बंगळुरुतही त्याची काटेकोट अंमलबजावणी होत आहे. कारण, जेवताना, चहापाण्याच्या वेळेस आपण मास्क काढतो. एकमेकांच्या समोर येतो तेव्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं होतो. त्यामुळे या गोष्टी टाळणं नितांत गरजेचं आहे, असं अजित पवार म्हणाले.