
सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे ती भाजप व मनसे युती होणार का? या प्रश्नाची. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही २०२४ ला सिंगल इंजिन येणार असं म्हटल्याने हि युती होणार नसल्याचं बोललं जात आहे. आज पुणे महामेट्रोच्या कामाची चाचणी घेण्यात आली यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
पत्रकारांनी भाजप मनसे युती होणार का? असा प्रश्न विचारला असता “मेट्रोला एकच इंजिन असतं. डबल इंजिनची आवश्यकता मेट्रोला नसते, त्याचप्रमाणे आम्ही २०२४ च्या निवडणुकीत सिंगल इंजिनवरच येणार आहोत” अशी प्रतिक्रीया दिली आहे.
चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांना अपयश?
या युतीसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकेर यांची दोन वेळा भेट घेतली. एकदा नाशिक दौऱ्यावेळी व दुसरी राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवसस्थानी. दुसऱ्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील युतीचा प्रस्ताव घेवून अमित शाह यांच्या भेटीसाठी दिल्ली गाठली. परंतू, आता देवेंद्र फडणवीस यांच्या विधानाने चंद्रकांत पाटील-राज ठाकरे यांची भेट निष्फळ ठरली का? असा प्रश्न उपस्थित होतो.
चर्चा मुंबई महानगरपालिका युतीची उत्तर विधान सभेचं
सध्या भाजप मुंबई महानरपालिकेच्या निवडणूकीची तयारी करत आहे. त्यासाठी ते मुंबईतील स्थानिक पक्षांसोबत जवळीक वाढवत आहेत. याच निवडणूकीसाठी मनसे भाजप एकत्र येणार असल्याचं बोललं जात होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या विधानामुळे २०२४ ची निवडणूक भाजप स्वबळावर लढवणार हे स्पष्ट झालं असलं तरी मुंबई महानगरपालिका निवडणूकीसाठी एकत्र येणार का? हा प्रश्न कायम आहे.
दरम्यान, सध्या मनसे सोबत युती होणार नाही हे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं असलं तरी याआधी देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत युती कधीच होणार नाही असं म्हटलं होतं आणि अजित पवार यांना सोबत घेवून मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती.