Election Education : मतदार यादीत नाव (Voter ID) नोंदणीसाठी काय करावे ? दुसऱ्या शहरात किंवा नोकरी करणाऱ्यांनी कुठे आणि कसं मतदान करावं? असे अनेक प्रश्न सध्याच्या तरुणाईच्या मनात आहेत. इच्छा असूनही मतदान करता येत नसेल तर काय करावे. तुमच्या अशा विविध प्रश्नांची उत्तर या बातमीतून जाणून घ्या.(election education voter registration guidelines explained correction transfer )
प्रश्न – 18 वर्ष पूर्ण केलेली असूनही मतदान का करता येणार नाही?
लोकप्रतिनिधी कायदा 1950 नुसार, 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर या पात्रता तारखा मानल्या जातात. म्हणजेच या तारखेपर्यंत 18 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तीला आगामी निवडणुकीत मतदान करता येईल.
मात्र, जर तुम्ही 2 ऑक्टोबरनंतर 18 वर्षांचे होत असाल आणि निवडणुका नोव्हेंबरमध्ये असतील तर तुम्ही मतदान करू शकणार नाही. तुमची पात्रता तारीख पुढील 1 जानेवारीला असेल. म्हणजे पुढील लोकसभा निवडणुकीपूर्वी तुम्ही मतदान करण्यास पात्र ठराल.
प्रश्न – 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर किंवा त्यापूर्वीच मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अर्ज करता येईल का?
जानेवारी 2023 मध्ये मुख्य निवडणूक अधिकारी आणि निवडणूक विभागाचे प्रधान सचिव प्रवीण गुप्ता यांनी सांगितले होते की, 17 वर्षे पूर्ण झालेले सर्व तरुण मतदानासाठी नोंदणी करू शकतात.
आगामी पात्रता तारखेला ते 18 वर्षांचे झाल्यावर त्यांना मतदार ओळखपत्र दिले जाईल.
ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही पद्धतींनी मतदार यादीसाठी नाव नोंदणी करू शकता. तुम्ही तुमच्या मतदान क्षेत्राच्या एसडीएम कार्यालयाशी (ईआरओ-निवडणूक रिटर्निंग ऑफिसर) किंवा तुमच्या प्रादेशिक मतदान केंद्राच्या बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) यांच्याशी संपर्क साधून ऑफलाइन अर्ज करू शकता.
प्रश्न – मतदार नोंदणीसाठी कोणत्या कागदपत्रांची पूर्तता होणं आवश्यक आहे?
फॉर्म-6 वर एक पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो. रहिवासी पत्त्याच्या पुराव्यासाठी रेशनकार्ड, पासपोर्ट किंवा रहिवासी प्रमाणपत्र यांसारख्या कागदपत्रांच्या झेरॉक्स जोडाव्या लागतात. ओळखपत्रासाठी डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेट, पॅन कार्ड, आधार कार्ड किंवा बोर्ड परीक्षेचे प्रमाणपत्र यापैकी काहीही एक जोडता येते.
प्रश्न – ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर तो प्रत्यक्ष रिटर्निंग ऑफिसर कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे का?
जर तुम्ही नॅशनल व्होटर्स सर्व्हिस पोर्टल (NVSP) वर ऑनलाइन अर्ज केला असेल तर तो कार्यालयात जमा करण्याची गरज नाही. ब्लॉक लेव्हल ऑफिसर स्वतः ते डाउनलोड करून तुमच्या पत्त्यावर पडताळणीसाठी जातात.
प्रश्न – नोंदणी केल्यानंतर मतदार यादीत नाव समाविष्ट झाले आहे की नाही हे कसे कळणार?
नोंदणीनंतर, मतदार यादीत नाव जोडण्यासंबंधीची माहिती फॉर्म 6 मध्ये दिलेल्या पत्त्यावर पोस्टाद्वारे किंवा मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवून दिली जाते. यानंतर, राज्य निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवरून आपले व्होटर आयडी कार्ड डाउनलोड करू शकता.
प्रश्न – मतदान यादी किंवा ओळखपत्रात नाव, पत्ता याबद्दल चुका असतील तर त्या कशा सुधारता येतील?
मतदार यादीत नाव, पत्ता यासंबंधात काही चुका असतील तर त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतीने सुधारता येतील. ऑनलाइन दुरुस्ती करण्यासाठी, मतदार सेवा पोर्टलच्या www.nvsp.in वेबसाइटला भेट द्या. फॉर्म-8 मधील सर्व माहिती भरल्यानंतर त्याच्याशी संबंधित कागदपत्रे अपडेट करा. तुम्हाला ऑफलाइन बदल करायचे असल्यास आवश्यक कागदपत्रांसह फॉर्म-8 भरून बीएलओकडे अर्ज करा.
प्रश्न – मतदार यादीत नाव चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केल्याबद्दल कोण आक्षेप घेऊ शकतं का?
संबंधित मतदारसंघातील मतदार असलेली कोणतीही व्यक्ती आपल्या क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीचे नाव मतदार यादीत चुकीच्या पद्धतीने समाविष्ट केल्याबद्दल आक्षेप घेऊ शकते. यासाठी फॉर्म-7 द्वारे दावा करावा लागेल की संबंधित व्यक्ती मतदार म्हणून नोंदणी करण्यास पात्र नाही. याशिवाय फॉर्म-7 द्वारे कोणत्याही भागातील मतदार यादीतून नाव काढता येऊ शकते.
प्रश्न – विद्यार्थी किंवा नोकरी करणारी व्यक्ती त्याच्या घरापासून दूर दुसऱ्या शहरात राहत असल्यास त्याच शहरात मतदान करता येते का?
जर एखादा विद्यार्थी किंवा नोकरी करणारी व्यक्ती घरापासून दूर इतर शहरात राहत असेल, तर त्याला दोन ठिकाणाहून मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल.
एखादा विद्यार्थी राज्य, केंद्रीय किंवा डीम्ड विद्यापीठात शिकत असेल, तर तो त्या शहरातही मतदानासाठी नोंदणी करू शकतो. त्यासाठी तो ज्या अभ्यासक्रमात शिकत आहे तो एक वर्षांपेक्षा कमी नसावा.
तुम्ही NRI असाल पण दुसऱ्या कोणत्याही देशाचे नागरिक नसल्यास अशा व्यक्तीही व्होट करू शकतात.
प्रश्न – व्होटर ID हरवले तर पुन्हा कसे बनवायचे?
भारतीय निवडणूक आयोग (ECI) द्वारे मतदार ओळखपत्र जारी केले जाते. तुमचे व्होटर ID हरवल्यास तुम्ही ‘मतदार सेवा पोर्टल’ वर जाऊन तुमचे व्होटर ID पुन्हा ऑनलाइन डाउनलोड करू शकता. तुमच्या व्होटर IDचा गैरवापर होऊ नये यासाठी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार नोंदवणे आणि त्याची झेरॉक्स स्वत:जवळ बाळगणे गरजेचं आहे.