फलटण : श्रीमंत मालोजीराजे यांचे आदर्श आणि राज्य कारभार करताना सर्व सामान्य जनता, शेतकरी व अन्य समाज घटकांना न्याय देण्याची कार्यपद्धती स्वीकारुन राजकारण व समाजकारणात गेली २५/३० वर्षे सक्रीय असलेल्या श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांनी नवे आदर्श निर्माण केल्यानेच त्यांना उज्ज्वल यश आणि सर्वसामान्यांचा पाठिंबा लाभत असल्याचे नमूद करीत त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे आज मुंबईत बाजार समिती पदाधिकारी व संचालकांचा होत असलेला सत्कार असल्याचे दीपकराव चव्हाण (Deepakrao Chavan) यांनी सांगितले.
नवभारत (नवराष्ट्र) या राज्यातील विविध जिल्ह्यात, अनेक भाषांमध्ये प्रकाशित होत असलेल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या सभागृहात आयोजित सहकार परिषदेत आदर्श कारभार करणारी, शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देवून केवळ शेतमाल विक्री नव्हे त्यांचे सर्व प्रश्न, समस्यांची सोडवणूक आणि त्यांना कृषी विषयक मार्गदर्शन आणि आवश्यक साधने, सुविधा उपलब्ध करुन देणारी राज्यातील एक आदर्श बाजार समिती म्हणून राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते खास पुरस्कार देऊन विशेष सत्कार होत आहे.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सन १९९५ मध्ये विधानसभेत पोहोचताच कृष्णा लवादानुसार उपलब्ध झालेले राज्याचे वाट्याचे ५९४ टीएमसी पाणी ऑगस्ट २००० पर्यंत अडविले नाही तर राज्याचा त्यावरील हक्क जाणार असल्याचे निदर्शनास आणून देत मंत्री मंडळात स्थान नको पण राज्यातील कायम दुष्काळी पट्टयातील ३५ तालुक्यांना कृष्णेचे पाणी द्या अशी मागणी तत्कालीन मनोहर जोशी सरकार समोर ठेवली. किंबहुना फलटण येथे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत आयोजित पाणी परिषदेत महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना करुन घेऊन राज्याच्या वाट्याचे संपूर्ण पाणी तर अडविलेच पण कायम दुष्काळी तालुक्यात कृष्णेचे पाणी पोहोचविले. त्याचा परिणाम म्हणून फलटण तालुका लवकरच १०० टक्के बागायत होत असल्याचे दीपकराव चव्हाण यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
कृष्णेचे पाणी पोहोचल्याने तालुका १०० टक्के बागायत झाला तरी केवळ ऊसाचे क्षेत्र वाढून चालणार नाही. ऊसाबरोबर अन्य पिकाखालील क्षेत्रात वाढ झाली पाहिजे, फळबागाखालील क्षेत्रात वाढ आणि फळ व अन्य शेतमाल प्रक्रिया उद्योगांची उभारणी यासाठी प्रयत्नशील असताना श्रीराम व साखरवाडी साखर कारखान्यांची गाळप क्षमता वाढ आणि उपपदार्थ निर्मितीला प्राधान्य यासाठीही श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे, श्रीमंत संजीवराजे यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेले प्रयत्न फलटण तालुका राज्यातील कृषी विकासातील एक आदर्श तालुका म्हणून नावारुपाला आणतील.