स्मिता मांजरेकर
स्मॉल स्क्रीनवरील लोकप्रिय स्त्री प्रधान मालिका म्हणजे ‘आई कुठे काय करते’. या मालिकेतील अरुंधतीची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली आहे. स्वत:चा आत्मसन्मान जपणारी स्त्री त्याचबरोबर मुलांच्या भविष्यासाठी, त्यांच्या जडणघडणीसाठी सतत प्रयत्नशील असणारी अशी अरुंधती. कतृत्वदक्ष आईचं रुप या मालिकेतून प्रेक्षकांच्या समोर आलं. मात्र तितकीच कणखर, कठोर तर कधी वात्सल्वमूर्ती असं तिचं रुप दिसलं. आईची ही वेगवेगळी रुप असली तरी आपण नेहमीच तिला गृहित धरतो आणि म्हणतो ‘आई कुठे काय करते’. (Aai kuthe kay karte) याच संकल्पनेवर आधारित ‘आई कुठे काय करते’ ही मालिका आकाराला आली. अल्पावधीतच या मालिकेने टीआरपीचे सगळे रेकॉर्ड मोडले. या मालिकेच्या यशात अरुंधतीचा मोठा वाटा आहे आणि ही अरुंधतीची (Arundhati) सक्षक्त भूमिका अभिनेत्री मधुराणी गोखले प्रभूलकरने तितक्याच सक्षक्तपणे स्मॉल स्क्रीनवर साकारली. आजच्या जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने अरुंधती म्हणजे मधुराणी गोखले प्रभूलकर (Madhurani Gokhale prabhulkar) हिच्याशी आमची प्रतिनिधी स्मिता मांजरेकर यांनी केलली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत
ही मालिका जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा मी ब-याच कालावधीने टेलिव्हिजन करणार होती. त्यामुळे मनात कुठेतरी धाकधुक होती. इतक्या वर्षांचा गॅप नंतर आपण हे करू शकतो का? इतकी महत्त्वाची भूमिका, महिन्याचे वीस-बावीस दिवस काम करायचं ते सुध्दा मुंबईत आणि माझी मुलगी पुण्यात. त्यामुळे ही सगळी तारेवरची कसरत होती. पण एक-एक करत करत गेले आणि मला त्यातले मार्ग सापडत गेले. तसंच सुरुवातीला मला या मालिकेच्या टीमने एवढंच सांगितलं होतं की, एका सर्वसामान्य गृहिणीचा आत्मसन्मापर्यंतचा हा प्रवास आहे आणि मूळात अरुंधती सुरुवातीला साकारताना एक सर्वसामान्य गृहिणी होती. पण मधुराणी म्हणून मी फार स्वयंपाकात रमणारी कधीच नव्हते. मला
नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची आस आहे. तशापध्दतीने मी संसार करत आली आहे. त्यामुळे मला सुरुवातीची अरुंधती कळायला खूप वेळ लागला. पण अगदी कठिणही नव्हतं. कारण आसपास मी अशा खूप स्त्रिया पाहिल्या होत्या. ज्यांनी संसारात स्वत:ला पूर्णपणे विरघळून टाकलं होतं. स्वत:ची स्वप्न बाजूला सारून संसारात झोकून दिलेल्या स्त्रिया मी पाहिल्या होत्या. त्याचा मला ही भूमिका साकारताना फायदा झाला. मला नेहमीच वाटायचं मधुराणी म्हणून मी खूपच सक्षम आहे, कॉन्फिडंट आहे. पण अरुंधती ही मधुराणीच्याही पुढची आहे आणि तिच्याकडनं मला खूप शिकायला मिळालं. अरुंधतीकडून मला प्रचंड उर्जा मिळाली. स्वत:च्या तत्वात, स्वत:ला जे पटत नाहीए त्यातून बाहेर पडण्यासाठी या वयातही प्रचंड ताकद लागते. ती ताकद अरुंधतीमुळे मला मिळाली.
मधुराणीमधली आई आणि माझी आई
मी आई म्हणून टिपीकल आई अजिबात नाहीए. माझ्या मुलीला मी आजही मैत्रिणीसारखीच वागवते. आता ती नऊ वर्षांची आहे. माझी मतं मी कधी तिच्यावर लादली नाही. त्यामुळे आमचं नातं खूपच वेगळं आहे. मात्र माझी आई मात्र टिपीकल आई होती. तिने मला वेगवेगळ्या गोष्टी करायला खूप प्रोत्साहन दिलं आणि आज मला प्रत्येक गोष्टीत त्याचा खूप उपयोग होतो आहे. तिने वयाच्या पासष्ट्याव्या वर्षी संगीतात पीएचडी केली आहे. त्यामुळे ती माझ्यासाठी खूपच प्रेरणा स्थानी आहे.
संजना आणि अरुंधती (Sanjana and arundhati)
संजनाचा एक वेगळा प्रवास आहे. ती ज्या परिस्थितीतून आली आहे. तिची जडणघडण जशी झाली, तशी ती आहे. म्हणून ती वाईट स्त्री नाहीए असं मला नक्कीच वाटतं. ती पण आई आहे. तीपण एका अपयशी लग्नातून गेलीय आणि आता तिच्या आयुष्यासाठी अनिरुध्दचं हे सर्वस्व आहे. पण मधुराणी म्हणून किंवा अरुंधती म्हणून कधीच तिला नाकारत नाही किंवा वाईट ठरवत नाही.
लेखिकेबद्दल
अरुंधती जी काही उभी आहे ती आमच्या लेखिका नमिता वर्तक (Namita Vartak) आणि संवाद लेखिका मुग्धा गोडबोले (Mugdha Godbole) यांच्या लेखनातूनच उभी राहिली आहे. तसंच आमचे दिग्दर्शक रवींद्र करमरकर यांनी मोलाची साथ दिली. या तिघांनी मिळून मला अक्षरश: बोट धरून अरुंधतीपर्यंत पोहोचवलं आहे. मुग्धाचे काही संवाद तर कुठेतरी लिहून ठेवाव्यात असं वाटतं. जेव्हा आयुष्यात गुंतागुंती असेल किंवा निराश वाटेल. तेव्हा ते संवाद पुन्हा पुन्हा वाचेल.
या सिरिअलने टेलिव्हिजनवर पायंडा पाडला..
खरंतर मी टेलिव्हिजनपासून इतके वर्षे लाबं होते त्याच कारण हेच होते की, खूप काळाच्या मागे जाणा-या भूमिका आणि मालिका पाहायला मिळत होत्या. काही न बोलणारी, सगळं सहन करणारी स्त्री म्हणजेच आदर्श स्त्री असं दाखवण्यात आलं होतं. पण खरंतर जेव्हा
टेलिव्हिजन सुरु झालं. तेव्हा शांतीसारख्या कतृत्ववान स्त्रिया समोर आल्या. पण अचानक ट्रॅक बदलला. फक्त सासू-सूनेचा ड्रामा स्मॉल स्क्रीनवर दिसत होता. मला त्याचा भाग बनायचं नव्हतं. तो समाजाला मागे नेणारा काळ होता. पण आता नवीन पायंडा पाडला आहे.अरुंधतीने आणि आई कुठे काय करते या मालिकेने आईचं महत्त्व, तिची जाणीव मुलांना करून दिलीच आहे. तसंच स्त्री म्हणून तिचीसुध्दा स्वप्न असतात आणि तिला ती पूर्ण करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे जाणीव प्रत्येक कुटुंबात जरी निर्माण झाली तरी मला वाटतं हा खूप मोठा बदल आहे. टेलिव्हिजनच्या माध्यमातून स्त्रिचं सबलीकरण जगात किंवा देशात आपण घडवू शकतो. तेव्हा उगाच सासू-सुनेची भांडण, किचन ड्रामा दाखवण्यापेक्षा स्त्रीला जागृत आणि सक्षम करणा-याच मालिका आणि भूमिका प्रेक्षकांसमोर याव्यात असं मला वाटतं.
आजच्या युगातील स्त्रीशक्ती
आजच्या युगातील काय, कुठल्याही युगातील स्त्री हे शक्तीचच रुप आहे. अफाट शक्ती आहे तिच्यात. ती काय करू शकत नाही? खरंतर सामाजिक बंधनामुळे स्त्रिया अनेक वर्षे मागे राहिल्या. दबलेल्या राहिल्या आहेत. पण मला असं वाटतं की, आता काळ बदलतो आहे.आता खरी ताकद तिची दिसून येतेय आणि स्त्री पुढे गेली तर नक्कीच ती समाजाला पुढे नेते अशा वळणावर नक्कीच आता आपण आहोत.