ऑस्ट्रेलिया : जागतिक क्रिकेटने शुक्रवारी एक दुर्मिळ हिरा गमावला. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्नचे वयाच्या ५२ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. या शतकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाला जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संघ बनवण्यामागे शेन वॉर्न हा एक खेळाडू होता, ज्याची सर्वात मोठी भूमिका होती. त्याचा लेग स्पिन, गुगली आणि फ्लिपर्सचा सामना सर्वोत्तम फलंदाजांनाही करणे कठीण होते. वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झालेल्या वॉर्नचे क्रिकेट ग्राऊंडवर केलेल्या दमदार कामगिरीसाठी नेहमीच स्मरणात राहील.
४ जून १९९३चा दिवस. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिकेचा सामना सुरू होता. या मॅचमध्ये शेन वॉर्नने चेंडू असा टाकला, जो पाहून जग आश्चर्यचकित झाले. वॉर्नचा हा चेंडू ९० अंशापर्यंत फिरला होता, असे सांगितले जाते. त्यामुळे त्याला बॉल ऑफ द सेंच्युरी म्हटले गेले.
शेन वॉर्न हा एकदिवसीय क्रिकेटमध्येही अतिशय प्रभावी गोलंदाज होता. १९९९ च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला चॅम्पियन बनवण्यात वॉर्नने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाच्या दोन महत्त्वाच्या सामन्यांमध्ये त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.