राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीमबागेच्या कार्यक्रमातून मोहन भागवत यांनी टॅरिफ वॉरवर भाष्य करत स्वावलंबाचा नारा दिला (फोटो - सोशल मीडिया)
RSS100Years : नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी सोहळा पार पडला आहे. आरएसएसला 100 वर्षे पूर्ण झाली असून यानिमित्ताने नागपूरमधील रेशमीबागेमध्ये दरवर्षीप्रमाणे सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. नागपूरमधील रेशीमबागेमध्ये संघाचा सोहळा पार पडला असून यावेळी शस्त्रपूजन आणि संचलन करण्यात आले. या कार्यक्रमात २१ हजारांहून अधिक स्वयंसेवकांनी सहभाग घेतला आहे. या शताब्दी वर्ष सोहळ्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती लावली. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपुरात आयोजित विजयादशमी उत्सव कार्यक्रमाच्या सुरुवातीला संघ संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही त्यांना नमन केले. संघ प्रमुख मोहन भागवत आणि माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विजयादशमी २०२५ च्या निमित्ताने शस्त्र पूजन केले. या विजयादशमी उत्सवात घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, यूके, यूएसए यांसारख्या विविध देशांतील अनेक विदेशी पाहुणे देखील सहभागी झाले आहेत.
संघाच्या शताब्दीच्या या उत्सवामध्ये सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशाच्या तरुणांना प्रोत्साहन केले. यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय परिस्थिती, टॅरिफ वॉर आणि शेजारील देशांमध्ये असणारी अराजकता अशा सर्वच विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, हिंदू समाज हा या देशासाठी उत्तरदायी असलेला समाज आहे, हिंदू समाज सर्वसमावेशक आहे. वर उल्लेख केलेली विविध नावे, रूपे पाहता, स्वतःला वेगळे मानणे आणि मानवांमध्ये विभाजन किंवा वियोग निर्माण करणे, हिंदू समाज’ आपण आणि ते’ या मानसिकतेपासून मुक्त आहे, मुक्त राहील. हिंदू समाज हा ‘वसुधैव कुटुंबकम’ या सर्वसामावेशी विचारसरणीचा प्रवर्तक तथा संरक्षक आहे. म्हणूनच, भारताला समृद्ध बनवणे, संपूर्ण जगाला त्याचे अपेक्षित आणि योग्य योगदान देणारा देश बनवणे हे हिंदू समाजाचे कर्तव्य आहे. जगाला एक नवीन मार्ग दाखवू शकणाऱ्या धर्माचे रक्षण करताना, भारताला समृद्ध बनवण्याच्या संकल्पाने, संघ आपल्या संघटित कार्यबलाद्वारे संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करण्याचे काम करत आहे,असे मत मोहन भागवत यांनी व्यक्तकेले.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
अमेरिकेने भारतावर टॅरिफ लादला आहे. याबाबत देखील मोहन भागवत यांनी भाष्य करत स्वदेशीचा नारा दिला. ते म्हणाले की, नुकतंच अमेरिकेनं जाहीर केलेले धोरण इतरांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यासाठी प्रचलित आर्थिक विकासाच्या पद्धतीवर आपण अवलंबून राहता कामा नये. जगाचा गाडा परस्पर संबंधांमधूनच चालतो. टॅरिफचा फटका सर्वांना बसत आहे. त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला असेल. परंतु, त्याचा इतर सर्वांनाच फटका बसतोय. त्यामुळे आपण इतर देशांवर अवलंबून राहून चालणार नाही. जग हे परस्पर अवलंबनावर चालतं, सगळ्यांनाच एकमेकांशी संबंध ठेवावे लागतात. परंतु, हे अवलंबन लाचारीत रुपांतरित होता कामा नये. त्यामुळेच जगात परस्पर संबंध निर्माण करणे आवश्यक आहे, कारण आपण एकटे जगू शकत नाही.”, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आर्थिक प्रणाली कधी बदलेल काही सांगता येत नाही, त्यामुळे आपल्याला स्वदेशी व स्वावलंबनाला पर्याय नाही. आपल्याला स्वावलंबी व्हावं लागेल. स्वदेशीचा अवलंब करावा लागेल, त्यानंतरही सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय संबंधांचं जतन करावं लागेल, पण त्यात नाईलाज नसावा, सक्ती नसावी, आपली इच्छा असायला हवी. पण ही निर्भरता नाईलाज बनू नये. त्यामुळे आपल्याला या गोष्टीला मजबुरी न बनवता, आत्मनिर्भर होऊन स्वत:च्या पायावर उभे राहायला शिकले पाहिजे, अशा भावना मोहन भागवत यांनी व्यक्त केल्या आहेत.