फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारत विरुद्ध पाकिस्तान महिला विश्वचषक : आशिया कप २०२५ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात एकूण तीन सामने खेळले गेले, ज्यात अंतिम सामनाही समाविष्ट होता आणि हस्तांदोलन न करण्याचा मुद्दा तिन्ही वेळा चर्चेचा विषय राहिला. आता, भारत आणि पाकिस्तान महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. भारताच्या संघाने पहिला सामन्यांमध्ये श्रीलंके विरुद्ध विजय मिळवल्यानंतर टीम इंडियाचा विश्वचषकामध्ये दुसरा सामना हा पाकिस्तान विरुद्ध श्रीलंकेत खेळवला जाणार आहे.
भारत पाकिस्तान यांच्यामध्ये क्रिकेटमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरू आहे. आता हा वाद महिला क्रिकेटमध्ये देखील पहायला मिळणार आहे. ज्याप्रमाणे पुरुष संघाने आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळला होता, त्याचप्रमाणे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील महिला संघही तेच करेल. म्हणजे, हस्तांदोलन होणार नाही, फोटोशूट होणार नाही आणि विरोधी संघाच्या खेळाडूंशी कोणताही संवाद होणार नाही.
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, महिला संघही सरकारच्या मार्गदर्शक तत्वांचे पालन करेल. “बीसीसीआय सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार काम करेल आणि टॉसच्या वेळी हस्तांदोलन होणार नाही, मॅच रेफ्रीसोबत फोटोशूट होणार नाही आणि खेळाच्या शेवटी हस्तांदोलन होणार नाही. महिला संघ पुरुषांनी स्वीकारलेल्या धोरणाचेच पालन करेल,” असे नाव न छापण्याच्या अटीवर सूत्राने पीटीआयला सांगितले.
श्रीलंका आणि भारत यांच्या संयुक्त आयोजनात २०२५ चा महिला एकदिवसीय विश्वचषक ३० सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यात आठ संघ सहभागी होत आहेत. पाकिस्तान आपले सर्व सामने कोलंबोमध्ये खेळेल. भारत आणि पाकिस्तान ५ ऑक्टोबर रोजी कोलंबोमधील आर. प्रेमदासा स्टेडियमवर एकमेकांसमोर येतील. हा सामना केवळ क्रिकेटच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर मैदानाबाहेरही बरीच चर्चा निर्माण करेल.
🚨 𝑹𝑬𝑷𝑶𝑹𝑻𝑺 🚨 In line with the men’s Asia Cup campaign, India’s women have reportedly been instructed by the BCCI not to shake hands with Pakistan ahead of their ICC Women’s World Cup league fixture. 🫱🏻🫲🏽❌#INDvPAK #CWC25 #Cricket #Sportskeeda pic.twitter.com/BcEVxoMdrd — Sportskeeda (@Sportskeeda) October 1, 2025
भारतीय महिला संघाची पाकिस्तानविरुद्धची कामगिरी आतापर्यंत पूर्णपणे एकतर्फी राहिली आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत ११ सामने खेळले आहेत आणि ते सर्व भारताने जिंकले आहेत, म्हणूनच यावेळीही भारतीय संघाचा वरचष्मा असल्याचे मानले जात आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारताने २०२५ च्या विश्वचषकाची दमदार सुरुवात केली आहे. संघाने त्यांच्या पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा ५९ धावांनी पराभव केला. एका विजयासह, भारत पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे आणि शक्य तितक्या लवकर उपांत्य फेरीत स्थान निश्चित करण्याचे त्यांचे लक्ष्य असेल. हे लक्षात घेण्यासारखे आहे की टीम इंडियाने कधीही विश्वचषक जिंकलेला नाही आणि यावेळी ते घरच्या मैदानावर हा दुष्काळ संपवण्याचा प्रयत्न करतील.