टेंभूर्णी / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मराठा समाजाच्या आरक्षण व न्याय हक्कासाठी अनेक मागण्या घेऊन मुंबईतील आझाद मैदानावर खासदार संभाजीराजे भोसले यांनी आमरण उपोषण सुरु केले. यास पाठिंबा म्हणून टेंभूर्णी, माढा येथील सकल मराठा समाजच्या वतीने शहर बंदची हाक दिली होती. त्यास शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून शंभर टक्के पाठिंबा दर्शविला. तर लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, अन्यथा येथून पुढील आंदोलन आक्रमक पद्धतीने करण्याचा इशारा देण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी तुकाराम ढवळे यांनी सांगितले की, आतापर्यंत मराठा समाजाने मोठ्या भावाची भूमिका घेत सर्व समाजाला आरक्षण दिले आहे. परंतु आता आरक्षण देणाऱ्या मराठा समाजाला आरक्षणाची गरज पडत आहे. ते मिळवण्यासाठी समाजाने आतापर्यंत शांततेत आंदोलन केले. परंतु, आजतागायत आरक्षण मिळाले नाही. हे समाज आता सहन करणार नाही.
आता इथून पुढची लढाई आरपारची करणार असून, यासाठी रक्ताचे पाट वाहिले तरी समाज मागे हटणार नाही, याची सरकारने दक्षता घ्यावी आणि छत्रपती संभाजीराजांच्या उपोषणाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या मान्य करा, अन्यथा महाराष्ट्रभर याचा भडका उडेल, असा इशारा त्यांनी दिला.