सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : विना परवानगी मुख्यालयात प्रवेश करणारे ग्रामसेवक, शिक्षक कारवाईच्या रडारवर आले आहेत. कार्यालयीन कामकाजवेळी मुख्यालयात जर महत्वपूर्ण काम असेल तर संबंधित विभागप्रमुखांच्या परवानगीचे पत्र आवश्यक आहे. विनापरवाना मुख्यालयात आल्यास थेट निलंबन करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी दिला आहे.
जिल्हा परिषद मुख्यालयात शिक्षक, ग्रामसेवक यांच्यासह कर्मचाऱ्यांना विना परवानगी प्रवेश नाकारण्यात आला आहे. सध्या कोविड-१९ विषाणूचा प्रसार वेगाने वाढत असून रुग्णसंख्याही वाढत आहे. त्यामुळे पुढील काळात त्याचा प्रसार जास्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असतानाही काही शिक्षक, ग्रामसेवक व कर्मचारी हे जिल्हा परिषद मुख्यालयात कारण नसताना फिरताना दिसतात. तसेच इतर कालावधीत सुद्धा स्वतःचे कामकाज सोडून अनेक कर्मचारी व शिक्षक जिल्हा परिषद मुख्यालयात फिरताना दिसून येत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील कामावर विपरीत परिणाम होत आहे. तसेच कोविड-19 वर नियंत्रण मिळविणेच्या दृष्टीने तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून जिल्हा परिषद प्रशासनाने आज प्रत्येक विभाग प्रमुखांना परिपत्रकाद्वारे कळविले आहे.
या परिपत्रकानुसार शिक्षक, ग्रामसेवक, कर्मचारी यांनी मुख्यालय सोडताना आपल्या कार्यालय प्रमुखांची लेखी पूर्वपरवानगी घ्यावी. लेखी पूर्वपरवानगी नसल्यास संबंधितांना जि.प. मुख्यालयात प्रवेश नाकारण्यात येईल.
– जि.प. मुख्यालयात प्रवेश करतेवेळी कोविड-19 लसीकरणाचे प्रमाणपत्र बंधनकारक राहील.
– जि.प. मुख्यालयात प्रवेश केल्यानंतर ज्या विभागाकडे कामासंदर्भात जाणार आहात त्या विभागाच्या अभ्यागत भेट नोंदवहीमध्ये आपली नोंद करावी.
– जर एकही शिक्षक, ग्रामसेवक, कर्मचारी पूर्वपरवागीविना जिल्हा परिषद मुख्यालयात आढळल्यास त्यास संबंधित कार्यालय प्रमुख/मुख्याध्यापक/केंद्रप्रमुखांना जबाबदार धरून प्रथम त्यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्यात येईल व त्याचबरोबर संबंधितांवर देखील प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी माहिती दिलीप स्वामी यांनी दिली.