दहिवडी : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी (Satara District Bank Election) दहिवडीमध्ये मतदान सुरू असून, दुपारी दोन वाजेपर्यंत सोसायटी मतदारसंघातून 74 पैकी 43 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर नागरी बँकेमधून 16 मतदारांनी मतदान केले. इतर मध्ये 10 दहा जणांनी मतदान केले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी मान तालुका सोसायटी मतदारसंघातून शिवसेनेचे नेते शेखर गोरे व राष्ट्रवादीचे नेते मनोज पोळ यांच्यात सरळ लढत होत आहे. विद्यमान संचालक आमदार जयकुमार गोरे यांनी माघार घेतल्याने ही लढत दुरंगी होत आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत सोसायटी मतदारसंघातून 43 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. उर्वरित मतदार आमदार गटाची असून ते कोणाला मतदान करणार यावरच दोन्ही उमेदवारांचे भवितव्य अवलंबून आहे.
आमदार जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांचे उमेदवारी अर्ज मागे घेऊन राष्ट्रवादीला बाय दिला. हे सर्व करत असताना त्यांची काही कामे राष्ट्रवादीकडून केली जावीत या आशेवर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहकार पॅनेल माण तालुक्यात ही मदत करण्याचे कबूल केले असल्याची चर्चा आहे. आमदार गोरे गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार मनोज पोळ यांना सर्व मते दिल्यास ते सहज विजयी होतील, अशी चर्चा मतदान केंद्राबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात होती.
दुपारी दोन वाजेपर्यंत आमदार गटाच्या मतदारांनी मतदान केले नव्हते. गोरे यांचे काम अजित पवार यांच्याकडे असून रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यासाठी मध्यस्थी करावी यासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. तर दुसऱ्या बाजूस आमदार गोरे, त्यांचे बंधू अंकुश गोरे व त्यांचे वडील भगवानराव गोरे यांची ही मीटिंग झाल्याची चर्चा आहे.