चित्रपट(Cinema) हे समाजप्रबोधनाचं प्रभावी माध्यम असल्याचं ओळखलेल्या दिग्दर्शकांनी या माध्यमाचा अचूक वापर करत कायम रसिकांच्या डोळ्यांत अंजन घालण्याचं काम केलं आहे. काही दिग्दर्शकांच्या चित्रपटांमध्ये नेहमीच समाजात घडणाऱ्या घटनांचं प्रतिबिंब उमटल्याचं पाहायला मिळतं. काहींमध्ये इतिहासातील थोर महापुरुषांच्या विचारांची सांगड घालत तरुणाईला दिशादर्शक ठरावं असं कथानक सादर केलं जातं. नुकताच प्रदर्शित झालेला ‘जयंती’(Jayanti Movie Review) हा मराठी चित्रपट (Marathi Movie)म्हणजे देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या महापुरुषांच्या विचारांचं मंथन करण्याचा प्रयत्न असल्याचं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. ‘जयंती’ या अनोख्या टायटलसोबतच सलमान खानच्या ‘अंतिम’ (Antim)या चित्रपटासोबत प्रदर्शित होणार असल्यानं हा चित्रपट खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आला. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी थोडी रिस्क घेत ठरलेल्या वेळेपेक्षा दोन आठवडे अगोदर चित्रपट प्रदर्शित केल्यानं प्रमोशनसाठी आवश्यक कालावधी मिळू शकला नाही. आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातूनच सर्वदूर पोहोचण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा विषय खूप साधा आणि सोपा आहे. आपण ज्या महापुरुषांची अभिमानानं नावं घेत, त्यांच्या नावाचे झेंडे खांद्यावर मिरवत राजकारण्यांच्या नादी लागून जे करतोय ती मुळीच त्या महापुरुषांची शिकवण नाही. आजच्या पिढीला याचं भान राखण्याची गरज आहे. आपण कोणासोबत उभं राहायला हवं याची जाणीव होणं गरजेचं आहे. त्यासाठी प्रत्येकवेळी उपदेशाचे डोस पाजण्याची गरज नाही, तर वास्तवात घडणाऱ्या काही घटनाही तरुणाईचे डोळे उघडण्यासाठी पुरेशा असल्याचं या चित्रपटात लेखक-दिग्दर्शक शैलेश नरवाडे यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आज समाजाला केवळ थोर पुरुषांच्या नावांची नव्हे, तर त्यांचे विचार आचरणात आणून स्वत:सोबत समाजाचाही विकास घडवण्याची असल्याचं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
छत्रपती आणि बाबासाहेब
छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचे मावळे आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी यांच्यात राजकारण्यांनी नेहमीच दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराज विरुद्ध साहेब असं चित्र रंगवत जाती-पातीचं राजकारण केलं आहे. आजच्या सुशिक्षीत पिढीसमोर राजकारण्यांचं थोतांड वारंवार उघडं पडत असलं तरी त्यातून कितपत बोध घेतला जातो हा वादाचा मुद्दा आहे. आजही जर राजकारण्यांनी जातीयवादाची एखादी ठिणगी टाकली, तर आपण लगेच एकमेकांविरुद्ध दंड थोपटू. केवळ छत्रपती शिवाजी महाराज आणि डॅा. बाबासाहेब आंबेडकरच नव्हे, तर सर्वच महापुरुषांनी आपल्याला हिच शिकवण दिली आहे का? या प्रश्नाचं अंतर्मुख होऊन उत्तर शोधण्याची गरज असल्याचं हा चित्रपट सांगतो.
संत्याच्या रूपात वास्तव चित्र
चित्रपटाची कथा संत्या म्हणजेच संतोष (ऋतुराज वानखेडे)नावाच्या दहावी नापास तरुणाभोवती गुंफण्यात आली आहे. स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणवून घेणारा संत्या आमदार विजय गोंदाणेच्या (किशोर कदम) हातातील बाहुलं बनून वावरत असतो. त्याच्याच विभागातील पल्लवी (तितिक्षा तावडे) नावाच्या तरुणीवर त्याचा जीव जडतो, पण काहीच कर्तृत्व नसलेल्या संत्याला पल्लवी त्याची पात्रता दाखवते. अशोक माळीसरांना (मिलिंद शिंदे)वस्तीत गरीब मुलांसाठी शाळा उभारायची असते, पण तरुणाईला बाबासाहेबांचं स्मारक बांधायचं असतं. त्यामुळं संत्या माळीसरांचा राग करत असतो. तिथल्याच एका मागसवर्गीय स्त्रीवर ती घरकाम करत असलेल्या बंगल्याचा मालक कुकरेजा (अमर उपाध्याय)अत्याचार करून तिची हत्या करतो. अचानक कथानक कलाटणी घेतं. संत्याला बरंच काही सहन करावं लागतं. त्यानंतर जे घडतं ते महापुरुषांच्या विचारांचं मंथनच म्हणता येऊ शकतं.
सादरीकरण आणि गती
चित्रपटाचा विषय आणि वनलाईन खूप छान आहे. पटकथाही चांगली असली तरी थोडीशी सैल झाली आहे. सादरीकरण आणखी चांगल्या प्रकारे करण्याची गरज असल्याचं जाणवतं. चित्रपटाची गती आणखी जलद असणं गरजेचं होतं. पूर्वार्धात घटना अतिशय संथ गतीनं घडत असल्यानं पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाटत नाही. एखादा शिक्षक कितीही व्रात्य असलेल्या मुलाला छडीचा मार न देता केवळ विचारांचं अमृत पाजून कशा प्रकारे वठणीवर आणू शकतो याचं उत्तम उदाहरण या चित्रपटात आहे. सर्वच गोष्टी उपदेशाचे डोस पाजून साध्य होत नाहीत, तर काहींसाठी योग्य संधीची आणि त्या जोडीला युक्तीची जोड देण्याची गरज असते. महापुरुषांची जयंती गल्लोगल्ली धुमधडाक्यात साजरी केली जाते. त्या दिवशी मद्यप्राशन करून धिंगाणाही घातला जातो, पण त्यांचे अमूल्य विचार आत्मसात करून किती जण स्वत:चं जीवन सफल करतात हा मुद्दा या चित्रपटात अगदी साध्या-सोप्या पद्धतीनं मांडला आहे.
बोलीभाषेवर मेहनत
पूर्वार्धात फार काही घडत नाही, तर उत्तरार्धात पावलोपावली थोरांच्या विचारांची ग्वाही दिली जाते. त्यामुळं उत्तरार्ध काहीसा लांबल्यासारखा वाटतो. संत्याचा स्ट्रगल दाखवण्यात फार वेळ न घेता समविचारी व्यक्ती कशा प्रकारे एकत्र येत यशस्वी होतात हे दाखवलं आहे. बोलीभाषेवर खूप मेहनत घेण्यात आली आहे. नागपूरकडची बोलीभाषा ऐकायला मिळते आणि त्यासाठी कलाकारांनी घेतलेली मेहनत चित्रपट पाहताना जाणवते. सिनेमॅटोग्राफी साधारणच म्हणावी लागेल. ‘भिमसैनिका…’हे गाणं स्फूर्तीदायक आहे. मंगेश धाकडेंचं पार्श्वसंगीत आणि गुरू ठाकूरची गाणी छान झाली आहेत. संकलनात काही दृश्यांना कात्री लावण्याची गरज होती. इतर तांत्रिक बाबीही ठिकठाक आहेत. चित्रपटाची गती वेगवान असती तर मजा आली असती.
कलाकारांचा तगडा अभिनय
पदार्पणातच ऋतुराज वानखेडे आणि तितिक्षा तावडे या दोघांनीही छान अभिनय केला आहे. ऋतुराजनं साकारलेला संत्या लक्षात राहण्याजोगा असून, आपण लंबी रेस का घोडा असल्याचं त्यानं निदर्शनास आणून दिलं आहे. ऋतुराजच्या तुलनेत तितिक्षाची भूमिका छोटी असली तरी, दमदार आहे. तिनं ती पूर्ण ताकदीनिशी साकारली आहे. मिलिंद शिंदेंनी साकारलेले माळीसर अफलातून आहेत. एका शिक्षकाची जबाबदारी नेमकी काय असते हे ओळखून शिंदे यांनी हे कॅरेक्टर साकारल्यानं ते थेट मनाला भिडतं. त्यांना दिलेले संवादही मार्मिक आहेत. किशोर कदम यांनी साकारलेला ग्रे शेडेड आमदारही चांगला आहे. वीरा साथीदार, पॅडी कांबळे, अमर उपाध्याय, अंजली जोगळेकर, अतुल महाले या कलाकारांचं कामही चांगलं झालं आहे. थोडक्यात काय तर हा चित्रपट महापुरुषांची विचारधारा जीवनात कशी उतरवायची हे जाणून घेण्यासाठी पाहायला हवा.