कराड : रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील शिवकालीन ज्योतिर्लिंग मंदिर व महादेव मंदिराला तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग दर्जा प्राप्त झाला आहे. हा आनंदोत्सव साजरा करत असताना मंदिराचे पावित्र्य जपण्याची गरज आहे. मंदिर जीर्णोद्धार व सुशोभिकरणामुळे गावाच्या सौंदर्यात भर पडली असून आता रेठरे बुद्रुक गावाचं सुशोभीकरण करण्याची मोहीम भविष्यात हाती घ्यावी लागणार असल्याचे मत कृष्णा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिले.
ज्योतिर्लिंग व महादेव मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाल्याचा आनंदोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठनेते मदनराव मोहिते, जि.प. सदस्य शामबाला घोडके, सेवा सोसायटीचे चेअरमन विश्वासराव मोहिते, सरपंच सुवर्णा कापूरकर, उपसरपंच शिवाजी दमामे, वाहन निरीक्षक उदय साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ.अतुल भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून रेठरे बुद्रुक, ता. कराड येथील जोतिर्लिंग मंदिर व महादेव मंदिर यांना तीर्थक्षेत्र ‘क’ वर्ग यात्रा स्थळांचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे आता या मंदिराचा विकास होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
यावेळी बोलताना डॉ.अतुल भोसले म्हणाले, शासनाने रेठरे येथील मंदिरांना ‘क’ वर्ग दर्जा देऊन सन्मान केल्याने आज आपण सर्वजन आनंदाचा क्षण साजरा करत आहे. आता वर्षाला मंदिराच्या देखभाल दुरुस्तीसाठी ५ लाख रुपये अनुदान मिळणार आहे. तेव्हा मंदिराचे पावित्र्य जपणूक व स्वच्छता गरजेची आहे. मंदिरात २४ तास पूजा, अर्चा, स्वच्छतेसाठी काही लोकांची नियुक्ती करावी. मंदिरांच्या जिर्णोद्धारामुळे गावाची शोभा वाढली आहे. आता आपण आपले गावही स्वच्छ व सुंदर होण्यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
जागतिक बँकेच्या सहयोगातून गावात २४ बाय ७ शुद्ध नळपाणी योजना सुरू झाली आहे. तसेच घनकचरा निर्मूलन, अंतर्गत रस्ते दुरुस्ती कामांना प्राधान्य दिले पाहिजे. गावात विविध विकासकामे होत आहेत. त्याचा वापरही निटनेटकेपणाने काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. तसेच गावातील विविध सार्वजनिक इमारत कार्यालयानाजीक स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. महादेव मंदिर जिर्णोद्धारासाठी निधी संकलनाचे काम सुरू आहे. यामध्ये ग्रामस्थानीं उत्स्फूर्तपणे सहयोग द्यावा, असे आवाहन डॉ. भोसले यांनी केले.
यावेळी जयवंतराव साळुंखे, विक्रमसिंह मोहिते, डॉ. राजकुमार पवार, संजय पवार, बबनराव दमामे, विक्रम साळुंखे, धैर्यशील चव्हाण, वसंत घोडके, भास्कर साळुंखे आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.
जीर्णोद्धारासाठी मदतीचे हात पुढे
कार्यक्रमाच्यावेळी मंदिर जिर्णोद्धार कामी विशेष प्रयत्नात सहभागी असणाऱ्या ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. तसेच आरटीओ उदय साळुंखे आणि इंजिनिअर धैर्यशील चव्हाण यांनी महादेव मंदिर जीर्णोद्धारासाठी प्रत्येकी ५१ हजार रुपये देणगी दिल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.