कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका चिपळूण सोबतच रायगड जिल्ह्यातील महाडलासुध्दा बसला आहे. अतिवृष्टीमुळे महाड शहर आणि जवळच्या गावांमध्ये पूरस्थिती आहे. पुराचे पाणी आणि अनेक ठिकाणी कोसळलेल्या दरडीमुळे लोक ठिकठिकाणी अडकून पडले आहेत. रायगडमध्ये बचाव कार्यासाठी काल हेलीकॉप्टरची मागणी केली होती. आज बचाव कार्यासाठी नेव्हीचे हेलीकॉप्टर दाखल झाले आहे.
रायगड जिल्ह्यातील पाचाड रस्त्यावर पडलेली दरड काढण्यात आली असून पथक तळई दरड ग्रस्त भागात निघाले आहे. हेलिकॉप्टर काही वेळेत महाड मध्ये दाखल होऊन राजेवाडी आणि इतर परिसरातील पुरात अडकलेल्या नागरिकांना काढण्यात येईल. लाडोली येथील आणि परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिली आहे.
पाचाड रस्त्यावर आलेली दरड बाजुला करण्यात यश आल आहे. एनडीआरएफ पथक तळई दरडग्रस्त भागाकडे पोहोचले आहे. हेलिकॉप्टरद्वारे काही वेळात महाडमध्ये बचावकार्य सुरू होणार आहे. लाडवली, परिसरातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. महाडमध्ये मोबाईल आणि अन्य संपर्क यंत्रणा अजूनही ठप्प आहे.
दरम्यान, महाडमध्ये दरड कोसळून ३० घरे मातीखाली दबल्याची माहिती मिळत आहे. महाड तालुक्यातील बिरवाडीपासून १४ किलोमीटर अतंरावर ही घटना घडली आहे. या घटनेत ३० घरे गाडली गेल्यामुळे यामध्ये एकूण ७२ नागरिक बेपत्ता झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु महाड शहरासह तालुक्यात विदारक परिस्थिती असून दुर्घटनेच्या ठिकाणचा सपंर्क तुटला आहे.