
MNS Amit Thackeray facebook post on hotel politics target eknath shinde bmc mayor
महापालिका निवडणुकीचा निकाल हाती आला आहे. यानंतर पुन्हा एकदा राज्यात हॉटेल पॉलिटिक्स सुरु झाले आहे. विजयी झालेल्या नगरसेवकांना निकाल लागल्यापासून एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. कोणत्याही नगरसेवकांने इतरांशी चर्चा करु नये म्हणून शिंदेंनी सावधगिरीने हे पाऊल उचलले असल्याचे बोलले जात आहे. त्याचबरोबर एकनाथ शिंदेंनी मुंबई पालिकेमध्ये सत्तास्थापन करण्यापूर्वी अटी घातल्या आहेत. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याच परिस्थितीवर मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया पोस्ट करुन जोरदार टीकास्त्र डागले आहे.
हे देखील वाचा : राज्यात महापालिका निवडणुका संपल्या; आता महापौरपदासाठी तयारी सुरु, ‘हा’ बडा नेता घेणार अंतिम निर्णय…
मनसे नेते अमित ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे की, “नगरसेवक ‘बेपत्ता’ आहेत?
निकाल लागल्यावर खरं तर लोकप्रतिनिधींनी आपल्या प्रभागात जाऊन जनतेचे आभार मानायला हवे होते, लोकांच्या समस्या सोडवायला सुरुवात करायला हवी होती. पण दुर्दैवाने, ज्यांना जनतेने निवडून दिलंय, ते आज फाईव्ह स्टार हॉटेलच्या बंद दाराआड ‘आनंदाने’ कैद आहेत,” असा टोला अमित ठाकरेंनी लगावला आहे.
हे देखील वाचा : वडगाव मावळमध्ये अनोखा अंदाज; एकूण 15 जागांवर ‘मविआ’ म्हणून ‘हे’ पक्ष लढणार
पुढे त्यांनी लिहिले आहे की, “याला नक्की कारण काय? स्वतःच्याच सहकाऱ्यांवरचा अविश्वास? स्वार्थी राजकारण? या राजकीय पळवापळवीमुळे ज्या सामान्य नागरिकांनी मतदान केले त्यांचा अपमान नाही का होतं? किती खाली घसरणार आहे महाराष्ट्राचे राजकारण? या सगळ्या नाटकामध्ये ज्या पर्यटकांनी स्वतःचे कष्टाचे पैसे भरून हॉटेल बुकिंग केलं आहे, त्यांनाही सुरक्षेच्या नावाखाली त्रास सहन करावा लागतोय. लोकांच्या हितापेक्षा स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी सुरू असलेला हा तमाशा आणि जनतेच्या पैशाची ही उधळपट्टी आता तरी थांबवा! ‘जमल्यास’… ज्या जनतेने तुमच्यावर विश्वास ठेवलाय तिच्यासाठी काहीतरी करा,” अशी मागणी अमित ठाकरे यांनी करत शिंदेसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे.