जिल्हा परिषद अन् पंचायत समिती निवडणूक (फोटो- टीम नवराष्ट्र)
वडगाव मावळमध्ये एकत्र आले 5 पक्ष
जिल्हा परिषद, पंचायत समितीसाथी मोर्चेबांधणी
15 जागांवर होणार आघाडी
वडगाव मावळ: मावळ तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), मनसे आणि वंचित बहुजन आघाडी या पाच पक्षांनी तालुक्यातील एकूण १५ जागांवर आघाडी म्हणून निवडणूक लढवण्यावर एकमत केले आहे.
यासंदर्भात वडगाव मावळ येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत हा निर्णय जाहीर करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंत मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे तालुकाध्यक्ष अशोक कुटे, गटनेते भारत ठाकूर, मनसेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, शिवसेना (उबाठा)चे तालुकाप्रमुख उमेश गावडे तसेच वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष लोखंडे उपस्थित होते.
नेत्यांनी सांगितले की, शाहू–फुले–आंबेडकरांच्या विचारधारेवर आधारित राजकारण करत लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. अलीकडे झालेल्या नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये तालुक्यात आघाडीला मिळालेला सकारात्मक प्रतिसाद लक्षात घेता, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकाही एकत्रितपणे लढवण्याचा निर्णय पक्का करण्यात आला आहे.
जागावाटपाची प्रक्रिया सुमारे ८० टक्के पूर्ण
जागावाटपाची प्रक्रिया सुमारे ८० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित जागांवर लवकरच सहमती होईल. निवडणुका संबंधित पक्षांच्या अधिकृत चिन्हांवरच लढवण्यात येणार असून, आघाडीतील सर्व घटक पक्ष परस्पर समन्वयाने प्रचार करणार आहेत. महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढवल्यास तालुक्यात लोकशाही अधिक मजबूत होईल आणि विकासाभिमुख पर्याय मतदारांसमोर ठेवता येईल, असा विश्वास यावेळी नेत्यांनी व्यक्त केला.
निवडणुकीसाठी इच्छुकांची फिल्डिंग
मावळ तालुक्यातील जिल्हा परिषदेचे पाच गट आणि पंचायत समिती मावळचे दहा गण अशा एकूण पंधरा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया शुक्रवार (दि. १६) पासून सुरू झाली आहे. मात्र, पहिल्या दिवसानंतर दुसऱ्या दिवशीही एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सुरेंद्र नवले आणि सहाय्यक निवडणूक अधिकारी विक्रम देशमुख यांनी दिली. उमेदवारी अर्ज अद्याप दाखल झाले नसले तरी अर्ज विक्रीला मात्र चांगला प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या दिवशी ७४ तर दुसऱ्या दिवशी ४१ असे एकूण ११६ उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.






