अहमदनगरः लोकसभा निवडणुकीच्यावेळी रिंगणात उतरलेल्या राजकारणातील दोन नातूंची मोठी चर्चा झाली होती. यातील एक खासदार झाला तर एकाला पराभवाला सामोरे जावे लागले. असे हे राजकारणातील दोन नातू म्हणजे नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांची औरंगाबाद-पुणे विमानप्रवासात भेट झाली. या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियात शेअर करीत डॉ. विखे यांनी याला सीमांपलीकडील मैत्री असे संबोधले. यावर नेटकऱ्यांनी मात्र विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी मैत्रीचे स्वागत केले, काहींनी राजकीय अर्थ काढला तर काहींना दोघांवर आणि त्यांच्या नेत्यांवरही टीका केली आहे.
विमान प्रवासादरम्यान सुजय विखे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये छान गप्पांची मैफल रंगली. सध्याची राजकीय घडामोडींवर ओझरती चर्चा झाली. बाकी इतरही अनेक महत्त्वांच्या विषयांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. जवळपास 40-50 मिनिटे दोघांनी शेजारी शेजारी बसून एकत्र विमानप्रवास केला.
Friendship Beyond Boundaries..!!@parthajitpawar pic.twitter.com/j0QzfXBoST — Dr. Sujay Vikhe Patil (@drsujayvikhe) October 16, 2021
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बहिणी आणि मुलगा पार्थ पवार यांच्यावर आयकर विभागाने कारवाई केली होती. पण, या प्रकरणी खुलासा करण्यासाठी भाजपचे नेते पुढे येत होते. माजी मुख्यमंत्री, माजी प्रदेशाध्यक्ष बोलत होते. मुळात ते पुन्हा येईन म्हणाले होते, पण ते जमेना म्हणून सरकार अस्थिर करण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे’, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
प्रवासानंतर सुजय विखे पाटील पाटील यांनी पार्थ पवार यांच्यासोबतचा फोटो आपल्या फेसबुकवर शेअर केला. ‘मैत्रीला सीमांचं बंधन नसतं’, असं म्हणत त्यांनी तो फोटो पोस्ट केला. या फोटोवर हजारो जणांनी लाईक्सचा वर्षाव केला तर कमेंट्समधून आपली मतं मांडली. काही कमेंट्स या दोघांची मैत्री अधोरेकित करणाऱ्या होत्या, तर काही कमेंट दोघांच्याही फिरकी घेणाऱ्या होत्या.