कराड : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या (Satara District Bank Election) रणधुमाळीला गती आली आहे. उदयनराजे भोसले यांनी कराडला भेट देत माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Udayanraje meets Prithviraj Chavan), काँग्रेसचे ऍड उदयसिंह पाटील-उंडाळकर तसेच भाजपचे प्रदेश सदस्य डॉ. अतुल भोसले यांची भेट घेतली. त्यांनी जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधल्याने जिल्हा बँक निवडणुकीची भलतीच चर्चा कराड तालुक्यात रंगली आहे.
उदयनराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांची फलटण येथे सोमवारी भेट घेऊन सुमारे दीड तास बंद दाराआड चर्चा केली. या भेटीने जिल्हा बँकेच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरू झाली. त्यानंतर उदयनराजेंनी आपला मोर्चा थेट कराडकडे वळवला. त्यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यांना दीपावालीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अनुषंगाने उदयनराजे यांनी आपली भूमिका पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर मांडली असल्याचे समजते. यावेळी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, इंद्रजित चव्हाण, सुनील काटकर उपस्थित होते.
त्यानंतर येथील खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात जाऊन कराड सोसायटी गटातील उमेदवार ऍड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची भेट घेतली. या भेटीमध्ये स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील-उंडाळकर (काका) हे आपले राजकीय गुरु असल्याचे सांगत त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेसह विविध निवडणुका लढवण्याचे उदयनराजे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने आपली भूमिका ऍड. पाटील यांच्या समोर मांडत कराड सोसायटी मतदार संघातील त्यांची भूमिकाही समजून घेतली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष व जनशक्तीचे गटनेते राजेंद्रसिंह यादव, नगरसेवक हनमंत पवार उपस्थित होते.
दरम्यान, कृष्णा साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले व भाजपाचे कार्यकारणी सदस्य डॉ. अतुल भोसले यांची कृष्णा हॉस्पिटलवर जाऊन खासदार उदयनराजे भोसले यांनी भेट घेतली. भोसले कुटुंबियातील कोणीही जिल्हा बँकेत उमेदवारी दाखल केलेली नाही. परंतु भोसले गटाचे जिल्हा बँकेतील महत्वपूर्ण आहे. उदयनराजे भोसले निवडणूक लढवत असलेल्या गृहनिर्माण गटातून तसेच कराड सोसायटी मतदार संघात त्यांची भूमिका निर्णायक आहे. या भेटीमध्ये दोन्ही गटातील उमेदवार आणि भविष्यातील जिल्हा बँकेचे राजकारण यावर सविस्तर चर्चा झाल्याचे समजते.
खासदार उदयनराजे भोसले यांनी कराडमध्ये येऊन जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या घटकांची भेट घेतली. त्यांच्याशी चर्चा केली. एकूणच या धावत्या दौऱ्यामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या रणधुमाळीला गती आल्याचे स्पष्ट झाले आहे.