फोटो सौजन्य - Social Media
राज्य शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी मुंबई शहर आणि स्पोर्ट्स किक बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल, धारावी येथे मुंबई विभागीय शालेय किक बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शहाजीनगर हिंदी शाळा, चित्ता कॅम्प येथील विद्यार्थ्यांनी जोरदार कामगिरी सादर करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. (Boxing Championship)
या शाळेचे प्रतिभावान विद्यार्थी संदीप संतोष पासवान आणि विवेक मोहनलाल साकेत यांनी उत्कृष्ट तंत्र, वेग आणि निपुणतेच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. त्यांच्या या यशामुळे त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अभेद्य मार्ग मोकळा केला आहे. विशेष म्हणजे, याआधी तालुका आणि जिल्हास्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेतही या दोन्ही विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक मिळवत सातत्यपूर्ण खेळाची छाप पाडली होती. त्याच दमदार कामगिरीची पुनरावृत्ती विभागीय स्तरावर करून त्यांनी महानगरपालिका शिक्षण विभागाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
फक्त मुलांनीच नव्हे, तर शहाजीनगर मनपा हिंदी शाळेच्या मुलींनीही स्पर्धेत चमक दाखवली. अनुष्का चव्हाण हिने कठोर मेहनत आणि समर्पणाच्या जोरावर रौप्य पदक मिळवले, तर प्रियांका केवट हिने कांस्यपदक पटकावत स्पर्धेत आपली वेगळी ओळख निर्माण केली. मुलींच्या या यशामुळे शाळेच्या क्रीडा कामगिरीत आणखी भर पडली आहे.
या सर्व विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण शिक्षक सुरेश दडस यांनी काटेकोर प्रशिक्षण दिले. कनिष्ठ शारीरिक शिक्षण पर्यवेक्षक किरण इंगळे आणि मुख्याध्यापक लक्ष्मण धनुष्यबाण यांच्या सहयोगातून विद्यार्थ्यांची तयारी अधिक मजबूत करण्यात आली. स्पर्धेतील त्यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल प्रशासन अधिकारी विद्या मॅडम, शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख दत्तू लवटे, उपशिक्षणाधिकारी किरत कुडवे आणि शिक्षणाधिकारी सुजाता खरे यांनी विजेत्या विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे मनापासून अभिनंदन केले.
शहाजीनगर मनपा हिंदी शाळेने विभागीय स्तरावर मिळवलेले हे घवघवीत यश केवळ विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचे फलित नसून शाळेतील क्रीडा संस्कृतीचेही द्योतक आहे. राज्यस्तरीय स्पर्धेतही हे विद्यार्थी अधिक उज्वल यश मिळवून शाळेचे नाव आणखी उंचावतील, अशी सर्वांनी आशा व्यक्त केली आहे.






