सौजन्य - नवराष्ट्र टीम
पिंपरी : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. खून, हाणामाऱ्या, गोळीबार अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडूनही प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता बेकायदेशीरपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट दोनने तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून चार पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त केली आहेत.
अटक केलेले आरोपी पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. ही कारवाई (१२ नोव्हेंबर) दुपारी बोडकेवाडी फाटा, हिंजवडी-माण रोडवर करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी एकाचे शरद मोहोळ टोळीशी कनेक्शन असल्याची माहिती मिळत आहे. प्रविण गुंडेश्वर अंकुश (वय २१, कात्रज, पुणे), विकी दिपक चव्हाण (२०, हिंजवडी फेस दोन, पुणे), आणि रोहीत फुलचंद भालशंकर (२२, जाधवनगर वडगाव बुद्रुक पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमर राणे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावारकर, अपर पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार, उपनिरीक्षक मयुरेश साळुंखे, दीपक खरात, सहायक उपनिरीक्षक संजय गवारे, प्रवीण दळे, नितीन ढोरजे, कुणाल शिंदे, तुषार शेटे, मोहम्मद गौस नदाफ, भाऊसाहेब राठोड, विक्रम कुदळ, बाबा चव्हाण, अली शेख, कृष्णा शितोळे, प्रशांत सैद, सुखदेव गावंडे, अमर राणे, दिनकर आडे, रवी पवार, धनंजय जाधव यांच्या पथकाने केली आहे.
पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार
मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या एका तरुणावर तिच्या मुलाने आणि त्याच्या वडिलांनी मिळून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना बुधवारी (११ नोव्हेंबर) रात्री १० वाजण्याच्या सुमारास श्री भैरवनाथ मंदिर, पिंपळे निलख येथे घडली आहे. या प्रकरणी ज्ञानेश्वर त्रंबक चोरघडे (३१, बाणेर बालेवाडी फाटा, पुणे) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बलभीम शिंदे (वय५२, पिंपळे निलख), एक अल्पवयीन मुलगा आणि एका अनोळखी तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलभीम शिंदे याला पोलिसांनी अटक केली आहे.






