@DrSJaishankar (फोटो- ट्विटर)
नवी दिल्ली: म्यानमार देशाला ‘यागी’ चक्रीवादळाचा मोठा फटका बसला आहे. म्यानमारमध्ये नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे. यागी चक्रीवादळामुळे म्यानमारमध्ये महापूर आला आहे. व्हिएतनाम आणि लाओस देशांना देखील या यागी चक्रीवादळाचा फटका बसला आहे. म्यानमारमध्ये चक्रीवादळामुळे आलेल्या या महापूरमध्ये तब्बल १०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान म्यानमरसह व्हिएतनाम आणि लाओस या देशांच्या भारताने मदतीचा हात पुढे केला आहे.
म्यानमारच्या सत्ताधारी लष्कराचे प्रवक्ते जा मिन तुन यांनी रविवारी सांगितले, या आपत्तीत ११३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ६४ नागरिक बेपत्ता झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. महापूर आल्याने म्यानमारमधील तीन लाखांपेक्षा अधिक लोकांना सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला आहे. दरम्यान, यागी चक्रीवादळाच्या प्रभावाचा सामना करण्यासाठी व्हिएतनाम, लाओस आणि म्यानमारला मदत करण्यासाठी भारताने रविवारी ऑपरेशन सद्भाव अंतर्गत आवश्यक मदत सामग्री पाठवली.
‘यागी’ चक्रीवादळ हे आशियातील सर्वात शक्तिशाली वादळ म्हणून ओळखले जात आहे. यागीच्या प्रभावामुळे म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाममधील अनेक भाग भीषण पुराच्या तडाख्यात सापडले आहेत. दक्षिण चीन समुद्रात या वादळाच्या प्रभावाच्या एक आठवडा आधी भूस्खलन झाल्यामुळे व्हिएतनाममध्ये १७० हून अधिक आणि म्यानमारमध्ये १०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.
भारताचा मदतीचा हात
ऑपरेशन सद्भाव हा भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीच्या अनुषंगाने दक्षिण-पूर्व आशियाई राष्ट्रांच्या आसियान असोसिएशनमध्ये मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारणासाठी योगदान देण्याच्या भारताच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे. भारताने व्हिएतनामला १० लाख अमेरिकी डॉलर आणि लाओसला १ लाख अमेरिकी डॉलरची मदतसाहित्य पाठवले आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर म्हणाले आयएनएस सातपुरा या नौदलाच्या जहाजातून १० टन रेशन, कपडे आणि औषधे म्यानमारला पाठवण्यात आली आहेत. भारतीय हवाई दलाच्या C-17 लष्करी वाहतूक विमानाने १० टन मदत सामग्री लाओसला दिली, तर ३५ टन मदत व्हिएतनामला पाठवली जात आहे.
India launches #OperationSadbhav.
Demonstrating our solidarity with the people affected by Typhoon Yagi, India is dispatching aid to Myanmar, Vietnam and Laos.
➡️ 10 tons of aid including dry ration, clothing and medicines left for 🇲🇲 onboard @indiannavy INS Satpura today.… pic.twitter.com/ooR0ipnxqI
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) September 15, 2024
परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले, हवाई दलाचे विमान व्हिएतनामसाठी ३५ टन मदत घेऊन जात आहे. ज्यात जलशुद्धीकरण साहित्य, पाण्याचे कंटेनर, ब्लँकेट, स्वयंपाकघरातील भांडी, सौर कंदील यांचा समावेश आहे. ते म्हणाले की १० टन मदत लाओसला पाठवली जात आहे. ज्यात जेनसेट, पाणी शुद्धीकरण साहित्य, स्वच्छता साहित्य, मच्छरदाणी, ब्लँकेट आणि ‘स्लीपिंग बॅग’ यांचा समावेश आहे. यागी चक्रीवादळामुळे आलेल्या पुराच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन मदत देण्यासाठी सरकारने ‘अभियान सद्भाव’ सुरू केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.