कोण आहेत Indigo एअरलाइनचे मालक? नेटवर्थ वाचून उडतील तुमचेही होश (Photo Credit - X)
राहुल भाटिया: इंडिगोचे नेतृत्व
इंडिगो एअरलाइनची कमान राहुल भाटिया या व्यक्तीच्या हातात आहे. ते माध्यमांपासून दूर राहणारे आणि साधे जीवन जगणारे म्हणून ओळखले जातात. राहुल भाटिया यांनी कॅनडातील वॉटरलू विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले आहे. ते व्यावसायिक कपिल भाटिया यांचे पुत्र आहेत. कपिल भाटिया यांची ‘दिल्ली एक्स्प्रेस’ नावाची ट्रॅव्हल एजन्सी होती.
राहुल भाटिया यांची एकूण संपत्ती
राहुल भाटिया यांच्या एकूण संपत्तीमध्ये २०१९ नंतर मोठी वाढ झाली आहे. २०२३ हुरून ग्लोबल लिस्टनुसार: त्यांची एकूण संपत्ती ३.५ अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक होती. इंडिगोच्या शेअर्समध्ये २०२५ मध्ये झालेल्या वाढीमुळे राहुल भाटिया यांची संपत्ती १० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. ही रक्कम इंडिगोच्या वार्षिक उलाढालीपेक्षा जास्त आहे, तसेच २०१५ मध्ये जेव्हा कंपनी शेअर बाजारात सूचीबद्ध झाली, त्यावेळच्या एकूण कंपनी मूल्यापेक्षा दुप्पट आहे. त्यांचे गुरुग्राममध्ये तीन हॉटेल्सही आहेत आणि त्यांना अर्नेस्ट अँड यंग अवॉर्ड, इकॉनॉमिक टाइम्स अवॉर्डसह अनेक मोठे पुरस्कार मिळाले आहेत.
इंडिगोची सुरुवात आणि भागीदारांमध्ये फूट
इंडिगो एअरलाइनची सुरुवात राहुल भाटिया यांनी एकट्याने केली नव्हती. इंडिगो एअरलाइनची सुरुवात राहुल भाटिया आणि राकेश गंगवाल यांनी एकत्र मिळून केली होती. कालांतराने त्यांच्यातील संबंधांमध्ये दुरावा आला आणि मतभेद वाढले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गंगवाल यांनी इंटरग्लोब एंटरप्रायजेसच्या माध्यमातून भाटियांच्या इंडिगोवरील नियंत्रण, पार्टी ट्रान्झॅक्शन आणि बोर्डाच्या कामातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिस्थिती इतकी बिघडली की २०१९ मध्ये राकेश गंगवाल यांनी थेट सेबी (SEBI) कडे तक्रार केली आणि हे प्रकरण न्यायालयात तसेच लंडन आर्बिट्रेशनमध्ये पोहोचले.
राकेश गंगवाल यांचा राजीनामा
फेब्रुवारी २०२२ मध्ये राकेश गंगवाल यांनी बोर्डावरून राजीनामा दिला आणि स्पष्ट केले की ते पुढील पाच वर्षांत आपली सर्व भागीदारी बाजारात विकून टाकतील. त्यानुसार त्यांनी आपला हिस्सा विकायला सुरुवात केली आहे. गंगवाल यांच्याशी मतभेद असूनही, इंडिगोच्या वाढीला कोणताही धक्का बसला नाही. २०२३ मध्ये इंडिगोने एका दिवसात २,००० हून अधिक उड्डाणे (Flights) चालवण्याचा विक्रम केला, जो कोणत्याही भारतीय एअरलाइनसाठी पहिला रेकॉर्ड आहे.
भाटियांच्या हाती पूर्ण कमान
राकेश गंगवाल यांच्या राजीनाम्यानंतर राहुल भाटिया यांनी इंडिगो एअरलाइनची संपूर्ण कमान आपल्या हातात घेतली आहे. फेब्रुवारी २०२२ मध्ये, त्यांना कंपनीची मूळ संस्था असलेल्या इंटरग्लोब एव्हिएशनचे व्यवस्थापकीय संचालक (Managing Director) म्हणून पाच वर्षांसाठी नियुक्त करण्यात आले.






