मुंबई, काश्मिरी पंडितांच्या जीवनावर आधारित ‘काश्मीर फाइल्स’ (Kashmir Files) चित्रपटाच्या प्रदर्शनाविरोधात उच्च न्यायालयात (high court) जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्याची दखल घेत खंडपीठाने मंगळवारी तातडीने सुनावणी निश्चित केली आहे.
‘काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. चित्रपटाचा ट्रेलरवरून नुकताच प्रदर्शित झाला. आता त्यावर आक्षेप घेत उत्तर प्रदेशचे रहिवासी इंतेझार हुसैन सय्यद यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून सदर चित्रपट मुस्लिमांनी काश्मिरी पंडितांच्या केलेल्या हत्येवर आधारित आहे. ज्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता असल्याचे याचिकेत म्हटले आहे. संपूर्ण चित्रपटात त्या काळात घडलेल्या घटनांवर एकतर्फी भाष्य करण्यात आले आहे. ज्यामुळे हिंदू समुदायाची माथी भडकू शकतत आणि देशभरात हिंसाचार घडू शकतो. सध्या अनेक राज्यांमध्ये निवडणुका होत असताना, राजकीय पक्षांकडून या मुद्याचा गैरवापर होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वत्र जातीय हिंसाचारात वाढू शकते. त्यामुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्याची तसेच याचिकेवर सुनावणी होईपर्यंत चित्रपटाचा ट्रेलर त्वरित काढून टाकावा, अशी विनंती याचिकाकर्त्याकडून करण्यात आली आहे.
त्यावर सोमवारी मुख्य न्या. दिपांकर दत्ता आणि न्या. विनय जोशी यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी पार पडली. तेव्हा, याचिकेची दखल घेत खंडपीठाने मंगळवारी तातडीने सुनावणी निश्चित केली.
विवेक अग्निहोत्री यांनी ‘काश्मीर फाइल्स’ दिग्दर्शन केले असून त्यात ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), मिथून चक्रवर्ती, पल्लवी जोशी (Pallavi Joshi) यांच्यासारखी स्टारकास्ट या चित्रपटात पहायला मिळणार आहे. येत्या ११ मार्चला चित्रपट प्रदर्शित होणार आहे.