मुंबई : कोरोनाच्या संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मनमानी पद्धतीने लॉकडाऊन लावून करोडो लोकांचे हाल केले. कोरोनाच्या गंभीर संकटात मुंबईतील लाखो उत्तर भारतीय नागरिकांना काँग्रेसने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने घरी पाठवले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच उत्तर भारतीयांना कोरोनाचे सुपरस्प्रेडर ठरवून त्यांचा घोर अपमान केला. मुंबई महानगरपालिका व उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपाला या अपमानाची भरपाई करावी लागेल, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी व्यक्त केले आहे.
मुंबईतील उत्तर भारतीय नेते गप्प का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना सचिन सावंत पुढे म्हणाले की, उत्तर भारतीयांनी कोरोना पसरवला हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य अत्यंत बेजबाबदार, दुर्दैवी व आपल्याच देशाच्या नागरिकांचा अपमान करणारे आहे. पंतप्रधान मोदींच्या वक्तव्यावर मुंबईतील उत्तर भारतीय नेते गप्प का आहेत? उत्तर भारतीय लोकांबद्दल मोदींच्या मनात किती प्रेम आहे हे या अपमानातून त्यांना दिसले असेलच? या घोर अपमानाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर भारतीय नागरिकांची माफी मागितली पाहिजे. काँग्रेसला बदनाम करण्याच्या नादात पंतप्रधान मोदींनी आपल्याचा देशाच्या नागरिकांना बदनाम केले.
मनमानी पद्धतीने अचानक लॉकडाऊन
कोरोना महामारीच्या गंभीर संकटाचा सामना देश करत असताना केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने झोपा काढल्या. लहरी व मनमानी पद्धतीने अचानक लॉकडाऊन लावून करोडो लोकांना मोठ्या संकटात ढकलले. या संकट काळात काँग्रेस पक्षाने मा. सोनियाजी गांधी यांच्या निर्देशानुसार मुंबईतील उत्तर भारतीय बांधवांना त्यांच्या गृहराज्यात पाठवण्याची व्यवस्था केली. त्यांच्यासाठी अन्नधान्य, औषधे, जीवनावश्यक वस्तूंची मदत पाठवली. वाहतुकीची सुविधा नसतानाही रेल्वे, बसच्या माध्यमातून आपल्या राज्यात जाऊ पाहणाऱ्या लाखो परप्रांतीय नागरिकांना काँग्रेसने सुविधा पुरवली व त्यांच्या राज्यात पाठवले.
[read_also content=”मोदींविरोधात काँग्रेस आक्रमक; उद्या राज्यभरातील भाजप कार्यालयासमोर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार https://www.navarashtra.com/latest-news/congress-aggressive-against-modi-congress-workers-will-stage-agitation-in-front-of-bjp-offices-across-the-state-tomorrow-nrdm-234653.html”]
मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती
देशाचे पंतप्रधान या नात्याने संकटकाळात नागरिकांना मदत करणे त्यांचे कर्तव्य असताना त्यांना वाऱ्यावर सोडून दिले. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना नमस्ते करताना किंवा मध्य प्रदेशातील काँग्रेस सरकार पाडण्यासाठी लॉकडाऊन केला नाही तेव्हा कोरोना पसरला नाही. ट्रेनही काँग्रेसने चालवली? पियुष गोयल थाळ्या वाजवत होते का?. गुजरातमधून गेलेले मजूर कोरोना पसरवत नव्हते. फक्त महाराष्ट्रातील उत्तर भारतीय मजूरांनी कोरोना पसरवला का? अशी प्रश्नांची सरबत्ती सावंत यांनी केली. मोदी सरकारने कोट्यवधी कामगारांना वाऱ्यावर सोडले म्हणून काँग्रेसने गरीब कामगारांच्या तिकिटांसाठी पैसे दिले. असहाय्यांना मदत करणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. ही शिवरायांची शिकवण आहे. म्हणून काँग्रेसने केलेल्या कर्तव्य पालनाचा आम्हाला अभिमान आहे असे सावंत म्हणाले. उत्तर भारतीय नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून झालेल्या अपमान विसरणार नाहीत व त्यांनी केलेल्या अपमानाची सव्याज परतफेड निवडणुकीत भाजपाला त्यांची जागा दाखवून करून देतील अशी अपेक्षा आहे, असे सावंत म्हणाले.