फोटो सौजन्य - Social Media
यूपीएससी परीक्षा ही केवळ भारतातच नाही तर जगातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. दरवर्षी लाखो विद्यार्थी यात सहभागी होतात. पण कधी विचार केलाय का, की व्हीलचेअरवर बसून आणि ऑक्सिजन सपोर्टवर राहून कोणी ही परीक्षा देऊ शकेल? केरळमधील लतीशा अन्सारी यांनी हे करून दाखवलं. त्यांनी दाखवून दिलं की स्वप्नं तर सगळेच बघतात, पण ती पूर्ण करण्याची जिद्द आणि जाज्वल्य इच्छाशक्ती काही मोजक्यांकडेच असते.
हिम्मतीची ओळख
लतीशा अन्सारी केरळमधील रहिवासी होत्या. २०१९ मध्ये त्यांनी यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा दिली तेव्हा त्यांचं नाव देशभर चर्चेत आलं. ही कहाणी सामान्य नव्हती. लहानपणापासून १,००० पेक्षा जास्त हाडांचे फ्रॅक्चर, व्हीलचेअरवर बसून ऑक्सिजन सपोर्टसह परीक्षा देणं – या सगळ्या गोष्टी अत्यंत कठीण होत्या. पण त्यांच्या चिकाटीने सिद्ध केलं की मनापासून प्रयत्न केला तर शारीरिक अडथळे काहीच आड येत नाहीत.
जन्मापासून संघर्ष
लतीशा यांना जन्मतःच ऑस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा टाइप-२ हा आजार होता. त्यामुळे हाडं खूप कमजोर होती. याशिवाय २०१८ पासून त्यांना पल्मनरी हायपरटेन्शनची समस्या झाली आणि श्वास घेणं कठीण झालं. अशा परिस्थितीत कोणीही खचून जाईल, पण लतीशा कधीच मागे हटल्या नाहीत. त्यांच्या आईवडिलांनी त्यांना प्रत्येक टप्प्यावर आधार दिला. हेच त्यांचं सर्वात मोठं बळ ठरलं.
शिक्षणासाठीची झुंज
लतीशाच्या आयुष्यात शिक्षण घेणं हेच मोठं आव्हान होतं. अनेक शाळांनी त्यांच्या शारीरिक स्थिती पाहून प्रवेश देण्यास नकार दिला. मात्र लतीशाने हार मानली नाही. त्यांनी संघर्ष करत पोस्ट-ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. यूपीएससी प्रिलिम्स परीक्षा दिल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल व्हावं लागलं. कोट्टायम जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना परीक्षा केंद्रात पोर्टेबल ऑक्सिजनची सोय मोफत करून दिली होती.
आयुष्य कमी, पण प्रेरणा मोठी
लतीशाच्या उपचारासाठी दरमहा सुमारे २५ हजार रुपये खर्च होत होते. तरीही त्यांनी मोठी स्वप्नं पाहिली आणि त्यांच्यासाठी अथक प्रयत्न केले. दुर्दैवाने १६ जून २०२१ रोजी अवघ्या २७ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. पण त्यांच्या छोट्या आयुष्यातील मोठं स्वप्न आणि जिद्दीची कहाणी आज लाखोंसाठी प्रेरणादायी ठरली आहे. लतीशा अन्सारी यांनी शिकवलेलं धडे म्हणजे शारीरिक मर्यादा ही अडचण नसून खरा कस होतो तो मनातील ध्येय, जिद्द आणि हिम्मतीचा.