देशात सर्वाधिक पाऊस मेघालयातील चेरापुंजी येथे कोसळतो. त्याखालोखाल महाबळेश्वरचा नंबर लागतो. मात्र, यावर्षी रत्नागिरी जिल्ह्याने महाबळेश्वरला मागे टाकले असून, हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १,२०० मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाली आहे.
भारतीय हवामान शास्त्र विभागाने देशातील पावसाची महत्त्वाची ठिकाणे आणि प्रमुख शहरांची नोंद जाहीर केली आहे. या नोंदीमध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील पावसाने महाबळेश्वरला मागे टाकून दुसरे स्थान पटकावले आहे. देशात मेघालय आणि आसामच्या काही विभागांमध्ये दरवर्षी मोठ्या पावसाची नोंद होते.
यावर्षी तौक्ते चक्रीवादळापासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने चेरापुंजीनंतर सर्वाधिक पावसाची नोंद केली आहे. हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात २१ जुलैपर्यंत रत्नागिरीत सरासरीपेक्षा सुमारे १,२०० मिलिमीटर अधिक पाऊस झाला आहे. चेरापुंजी मात्र अद्याप पावसाची सरासरी पूर्ण करू शकलेले नाही. रत्नागिरीत जिल्ह्यातील हर्णै येथे १ जूनपासून २,५०० मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला असून, तो सरासरीपेक्षा १,३०० मिलिमीटरने अधिक आहे. महाबळेश्वरमध्ये सरासरीच्या तुलनेत कमी २,२०० मिलिमीटर पाऊस झाला आहे.