युक्रेनचा शेवटचा उरलेला गड असलेल्या लिसिचान्स्क शहराच्या आसपासचा परिसर ताब्यात घेण्यासाठी रशियाच्या लष्कराने पूर्व लुहान्स्क प्रांतात गोळीबार तीव्र केला आहे. लुहान्स्क प्रांताचे गव्हर्नर यांनी शनिवारी ही माहिती दिली.युक्रेनियन सैनिक काही आठवड्यांपासून या शहराला रशियन ताब्यापासून वाचवण्याचा प्रयत्न करत होते. कारण जवळपास एक आठवड्यापूर्वीच शेजारचा स्वयारोडोनेत्स्क प्रदेश रशियाने ताब्यात घेतला आहे.
रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले की, त्यांच्या लष्करी दलांनी अलीकडच्या काही दिवसांत लिसिचान्स्कच्या बाहेरील तेल शुद्धीकरण केंद्रावर कब्जा केला आहे. तथापि, लुहान्स्कचे गव्हर्नर सेर्ही हैदाई यांनी दावा केला की, लढाई सुरू आहे. ‘टेलीग्राम’ मेसेज अॅपच्या माध्यमातून हैदाईने एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दिवसापासून आक्रमक सैन्य चारी बाजूने उपलब्ध सर्व शस्त्रांसह गोळीबार करत आहे. 2014 पासून रशियन समर्थक फुटीरतावाद्यांनी लुहान्स्क डोनेस्तकचा मोठा भाग व्यापला आहे, मॉस्कोने दोन्ही प्रदेशांना सार्वभौम प्रजासत्ताक म्हणून मान्यता दिली आहे.
सीरियन सरकारनेही बुधवारी सांगितले की ते दोन्ही प्रदेशांना स्वतंत्र सार्वभौम प्रदेश म्हणून मान्यता देईल आणि राजनैतिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी काम करेल. दरम्यान, रशियाचा मित्र बेलारूसच्या नेत्याने असा दावा केला आहे की युक्रेनने काही दिवसांपूर्वी आपल्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्रे डागली, परंतु हवाई संरक्षण प्रणालीने ती नष्ट केली. बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को यांनी याला चिथावणी देणारे कृत्य म्हटले आणि युक्रेनमधील युद्धात बेलारशियन सैनिक भाग घेत नसल्याचे सांगितले. बेलारूसच्या वक्तव्यावर युक्रेनच्या लष्कराने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.