सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Satara District Bank Election) अवघ्या ४९ सभासद व त्यांच्या सेवेसाठी असलेले सेवेकरी मंडळींमुळे जावळीत राजकारण पेटले. पण, जावलीच्या विकासाचे आजी-माजी आमदारांनी वाटोळे केले. तालुका भकास केला, असा गंभीर आरोप शिवसेनेचे जावळी तालुक्यातील नेते एस. एस. पार्टे गुरुजी व तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे यांनी मेढा येथे पत्रकार परिषदेत केला.
जावली सहकारी दूध पुरवठा संघ बुडवला. त्या पाठोपाठ कुडाळ येथील प्रतापगड साखर कारखाना बंद पाडला. एकही नवीन उद्योग जावळी तालुक्यात गेल्या वीस वर्षात उभा करता आला नाही. याला प्रामुख्याने शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले व त्यांचे बगलबच्चे जबाबदार आहेत. याबाबत स्थानिक पत्रकारांनीच आवाज उठवला पाहिजे, त्यांनी वस्तुस्थिती पाहून निर्भीडपणे भूमिका मांडली पाहिजे, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे.
जावळीतील शेतकऱ्यांचे ऊस सहकारी साखर कारखान्याने वेळेत घेऊन गेले नाहीत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान केले. त्यामुळे जावळी तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उभ्या शेतातील तयार ऊस जाळला. राजकारण केले गेले, आता सातारच्या राजेंनी मोठ्या मनाने आमदारकीसाठी निवडणूक न लढविता जावळीतील कर्तबगार व्यक्तीला आमदार करून मनाचा मोठेपणा दाखवून द्यावा, अशीही मागणी परिषदेत करण्यात आली.
जावळीचे सुपुत्र शहीद तुकाराम ओंबळे यांच्या केंडबे येथील जन्मगावी स्मारकाचा प्रश्न शिवसेनाच मार्गी लावणार आहे, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपचे आमदार असूनही तेरा वर्षे झाली अजून जागेचा प्रश्न सोडविता आला नाही. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दहा कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असेल तर शिवसेना नेते व मंत्री एकनाथ शिंदे, संपर्क नेते प्रा. नितीन बानूगडे-पाटील, जिल्हाप्रमुख यांच्या प्रयत्नाने केला आहे, त्याचा पत्रव्यवहार आमच्याकडे आहे.
सातारा जिल्हा बॅंकेची ४९ मते म्हणजे जावली तालुका नाही. १ लाख २० हजार मतदार म्हणजे संपूर्ण तालुका आहे. हे लक्षात ठेवा. याची ही अनेकांना आठवण करून दिली. महाविकास आघाडी सरकारनेच जावलीच्या विकासासाठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. भूमिपुत्रांना पाणी व रस्त्यांसाठी तसेच धरणासाठी आमच्या जागा दिल्या तुम्ही काय दिले? असा ही सवाल केला आहे. वीस वर्षांपासून जावली तालुका विकासापासून वंचित राहिला, असा गंभीर आरोप करण्यात आला.