वडूज : देशाच्या सीमेवर आपले जवान देश रक्षणासाठी सदैव तत्पर असतात म्हणून आपण सुखानं राहत आहोत, अनेक जवानाना देशसेवा बजावताना वीरमरण प्राप्त होते, अशावेळी वीरजवानांच्या पाठिशी समाजानं भक्कमपणे उभं राहणं आवश्यक असून या कुटुंबाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे मत माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी भवानवाडी ता. माण येथे व्यक्त केले.
यावेळी वारकरी युवा संप्रदायाचे अध्यक्ष अक्षय महाराज भोसले, दहिवडी नगरपंचायतचे नगराध्यक्ष धनाजी जाधव, नायब तहसिलदार आर. डी. बनसोडे, हेमंत दीक्षित आदींची प्रमुख उपस्थिती होती.
भवान वाडी ता. माण येथील वीर जवान दिनकर मारुती नाळे यांच्या 12 व्या पुण्यस्मरण निमित्त आयोजित कार्यक्रमात सिन्हा बोलत होत्या. 18 ऑक्टोबर 2009 रोजी जम्मू काश्मीरमधील पूंच उरी सेक्टर येथे 5 मराठा बटालियन तुकडीतील जवान दिनकर नाळे यांना वीरमरण आले होते.
या पार्श्वभूमीवर गेल्या सुमारे 11 वर्षांपासून अखंडपणे नाळे कुटुंबाच्या वतीने दरवर्षी पुण्यस्मरण कार्यक्रम आयोजित केला जातो.
यावेळी ह भ प अक्षय महाराज यांच्या कीर्तन सेवेनंतर कोरोना काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्ष चेतना सिन्हा, मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा कुलकर्णी, महा एनजीओचे अक्षय महाराज भोसले, संतोष महाराज, सुभेदार मोतीराम दडस, रविना यादव यश यादव आदींचा नाळे कुटुंब व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देशसेवेत आपल्या प्राणांचे बलिदान देणाऱ्या शहीद दिनकर नाळे यांच्या जीवनपटाची माहिती प्रा. राजेंद्र जगदाळे यांनी उपस्थितांना दिली. मात्र तब्बल बारा वर्षानंतर ही या वीर जवानाचं गावात कुठे स्मारक अथवा स्वागत कमान दिसत नसल्याची खंत अक्षय महाराज यांनी व्यक्त करून नाळे कुटुंबास सहकार्य करणार असल्याचे सांगितले.
मान्यवरांच्या हस्ते वीर जवान दिनकर नाळे यांच्या वीरमाता यशोदा नाळे,वीरपत्नी अर्चना नाळे यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी मराठा पाच बटालियनचे हवालदार रघुनाथ पोळ, हणमंत यमगर, नीलेश नवले, गणेश जाधव, अनिल राजगे, शुभम सावंत, शंकर नाळे, महेंद्र नाळे, शहीद दिनकर नाळे युवा मंच,ग्रामस्थांची उपस्थिती होती.