फोटो सौजन्य - Social Media
सध्या मराठी चित्रपटसृष्टीत झी स्टुडिओज आणि सनफ्लॉवर स्टुडियोज निर्मित ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. राज्यभर प्रेक्षकांकडून चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, कथा आणि कलाकारांच्या प्रभावी अभिनयासोबतच चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. नात्यांमधील सूक्ष्म भावना, घराघरात घडणाऱ्या प्रसंगांची हळुवार मांडणी आणि त्याला साजेशी संगीताची जोड यामुळे हा चित्रपट एक भावस्पर्शी अनुभव ठरत आहे.
नुकतेच या चित्रपटातील ‘गेले द्यायचे राहून, तुझे नक्षत्राचे देणे’ हे अजरामर गीत नव्या भावनिक रूपात प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मूळ आशा भोसले यांच्या स्वरात अजरामर ठरलेले हे गीत यावेळी जावेद अली यांच्या संवेदनशील आणि भावस्पर्शी आवाजात सादर करण्यात आले आहे. आरती प्रभू यांच्या अर्थपूर्ण शब्दांना देवदत्त मनीषा बाजी यांच्या संगीताची समर्थ साथ लाभली असून, गाण्यातील अंतर्मुखता, मनातील घालमेल आणि न बोललेल्या भावना प्रकर्षाने जाणवतात. आयुष्यातील अडचणींमुळे खचलेल्या दोन स्त्रियांची वेदना आणि त्यांच्या मनातील आशेचा धागा हे गीत अत्यंत प्रभावीपणे उलगडते.
हा चित्रपट नात्यांमधील भावबंध, सासू-सुनेमधील नाजूक नाते, आईपणाचा प्रवास आणि घरातील सूक्ष्म भावनांना स्पर्श करणारा आहे. त्यामुळेच या भावविश्वाशी सुसंगत अशी त्यातील गाणी प्रेक्षकांच्या मनात सहज घर करत आहेत. विशेष बाब म्हणजे मराठी संगीतातील काही अजरामर गीतांना आजच्या काळाशी सुसंगत ठेवत, त्यांचा मूळ आत्मा जपून नव्याने सादर करण्यात आले आहे. याआधीही या चित्रपटातील अशीच दोन गाणी प्रदर्शित झाली असून, ती संगीतप्रेमींमध्ये लोकप्रिय ठरली आहेत.
‘दिवस तुझे हे फुलायचे’ हे यशवंत देव यांचे अजरामर गीत या चित्रपटात नव्या संवेदनशीलतेने सादर झाले आहे. मंगेश पाडगावकर यांच्या शब्दांना कुणाल गांजावाला यांच्या परिपक्व आणि संयत आवाजाची साथ लाभली असून, सूरज धीरज यांच्या संगीतामुळे हे गाणे अधिकच हळवे आणि भावपूर्ण झाले आहे. आई होण्याच्या प्रवासातील आनंद, काळजी, हळवे क्षण आणि सासू-सुनेमधील प्रेमळ नाते या गाण्यात अत्यंत सुंदरपणे उमटते. त्याचप्रमाणे ‘डाव मोडू नको’ हे सुधीर फडके आणि राम फाटक यांचे अजरामर गीतही या चित्रपटातून नवसंजीवनी घेऊन आले आहे. वैशाली सामंत यांच्या आवाजात सादर झालेले हे गाणे घरातील गैरसमज, न बोललेल्या भावना, रुसवे-फुगवे आणि नात्यांमधील ताणतणाव यांचे हळवे प्रतिबिंब दाखवते. आधुनिक संगीतसाज असूनही मूळ भाव कायम ठेवण्यात हे गाणे यशस्वी ठरले आहे.
या तिन्ही गाण्यांसोबतच चित्रपटाचा टायटल ट्रॅकही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत असून, सध्या तो सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंडिंगमध्ये आहे. या गाण्यावर अनेक रील्स तयार होत असून, त्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता अधिक वाढताना दिसत आहे. दिग्दर्शक केदार शिंदे यांच्या मते, ही गाणी केवळ लोकप्रिय असल्यामुळे निवडलेली नाहीत, तर ती त्या-त्या प्रसंगाला अत्यंत चपखल बसतात. काही भावना शब्दांपेक्षा संगीतामधून अधिक प्रभावीपणे व्यक्त होतात आणि हेच या चित्रपटातील गाण्यांचे खरे वैशिष्ट्य आहे. एकूणच, ‘अगं अगं सुनबाई! काय म्हणता सासूबाई?’ हा चित्रपट नात्यांची गोष्ट सांगतानाच, जुन्या अजरामर गीतांच्या नव्या मांडणीतून मराठी संगीतप्रेमींना एक समृद्ध, हळवा आणि भावपूर्ण म्युझिकल अनुभव देतो.






