औंध : शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ज्यांनी हे दूध घेतले ते साहित्यात गुरगुरतात. शिक्षणाची कास धरली तर विकासाच्या वाटेवर जाता येते. समाजात परिवर्तन घडवण्याची ताकद शिक्षणात आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष सुनिल माने यांनी व्यक्त केले.
वडी हायस्कूल वडी (ता.खटाव) येथे स्व. इंताजबी हसीम मुलाणी कायम ठेव योजनेतून आणि स्व. यमुनाताई विठ्ठल येवले यांच्या स्मरणार्थ दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्धन ऍग्रोचे कार्यकारी संचालक विक्रमशिल कदम उपस्थित होते.
यावेळी औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त राजेंद्र माने, सरपंच वैशाली मोहिते, दत्तात्रय रुद्रुके, एस. के. माने, प्राचार्य चंद्रकांत खामकर, प्रभाकर देशमुख, ग्रामसेवक विनोद खाडे, मुख्याध्यापक विकास अडसुळे, शुभम शिंदे, अनिल सुर्यवंशी सुदर्शन मिठारे, नामदेव पाटील, संतोष येवले, विठ्ठल येवले, प्रकाश मोहिते, ज्ञानदेव येवले, रणजित येवले, बाबालाल मुलाणी, किशोर येवले, अतुल येवले, रवींद्र येवले, राजू येवले, विश्वजित येवले, फिरोज मुलाणी, राजू मुलाणी यांची प्रमुख उपस्थिती होती.
माने पुढे म्हणाले, वाचनामुळे प्रगल्भता येते आणि ज्ञानात भर पडते. दुर्दैवाने मोबाईल संस्कृतीत हरवल्यामुळे नवीन पिढीचे वाचनाकडे दुर्लक्ष झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. सत्ता राजकारण हे अळवावरचे पाणी आहे. उन्ह-पावसाच्या खेळाप्रमाणे ते बदलत राहते. चांगले शिक्षण घेऊन मिळवलेले ज्ञान चिरकाल टिकते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आहे. त्यांना योग्य दिशा देण्याचे काम शिक्षकांनी करावे.
माण खटावच्या मातीत बुध्दिवंतांची खाण आहे. प्रशासकीय सेवेत छाप पाडून या भागातील विद्यार्थ्यांनी ते सिध्द केले आहे. विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी आणि आईच्या स्मृती जतन करण्यासाठी मुलाणी कुटुंबियांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या कौतुकाचा राबवलेला उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. सर्व ग्रामस्थ आजी-माजी विद्यार्थ्यांनाबरोबर घेऊन वडी हायस्कूलची सुसज्ज इमारत लवकरच उभी करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षस्थानावरून बोलताना विक्रमशिल कदम म्हणाले, बक्षीस मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या मोजकीच असली तरी इतरांनी नाराज होऊ नका. नव्या उमेदीने बक्षीस जिंकण्याचा प्रयत्न करा. कष्टाने मिळालेले बक्षीसाने जीवनात नवीन उर्जा निर्माण होते. विद्यार्थ्यांनी जिद्द आणि परिश्रमाने यशाची शिखरे गाठावीत. आई वडील गुरुजनाचे गावाचे नाव उज्वल करावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी विजया कदम, रेवती येवले अक्षदा कबुले या दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. प्राचार्य चंद्रकांत खामकर, प्रभाकर देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. फिरोज मुलाणी यांनी प्रास्ताविक केले. मुख्याध्यापक विकास अडसुळे यांनी आभार मानले. सचिन काटकर यांनी सुत्रसंचालन केले.सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते.
ज्ञानाचे मंदिर अद्ययावत करा
गावातील शिक्षण व्यवस्था चांगली असली तर निश्चित गुणवान पिढी तयार होते. विद्यार्थी विविध क्षेत्रांत उच्चपदावर झेप घेऊन गावाचे नाव उज्वल करतात. त्यामुळे गावातील शाळा कशी आहे, याकडे सर्वांनी लक्ष देण्याची गरज आहे. ज्ञानाचे मंदिर चांगले असले तर गाव प्रगतीच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही. सुनील माने यांनी दिलेल्या सल्ल्याची तरुण पिढीत चर्चा सुरू होती.






